- राजेश शेगोकारअकोला: पाच राज्यांतील निवडणूक निकालावर भाष्य करताना भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा सूर लावला. या निकालांमुळे संभाव्य महाआघाडीमध्ये बिघाडी निर्माण होईल व बिघाडी झालेल्या पक्षांमधून नवी आघाडी तयार होईल, असे सूतोवाच त्यांनी केले. महाआघाडीच्या संदर्भात चाचपणी होत असतानाच निवडणूक निकालाच्या निमित्ताने अॅड. आंबेडकरांच्या या विधानातील ‘बिटवीन द लाइन्स’ खूप काही सांगून जाते. एकीकडे काँग्रेस भारिप चालेल; पण एमआयएम नाही, असे जाहीरपणे बजावत असतानाच त्यांना एमआयएम नको तर आम्हाला राष्टÑवादी नको, असे प्रत्युत्तर अॅड. आंबेडकर यांनी दिल्याने महाआघाडीच्या निर्मितीपूर्वीच बिघाडीचे बीजारोपण झाल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे गेल्या आठवड्यात स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुलडाण्यात राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सहा लोकसभा मतदारसंघांवर दावा करून दबाव वाढविला आहे. महाआघाडीतील संभाव्य घटकपक्षांच्या अटी-शर्तीमध्येच महाआघाडीचे बारा वाजणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे
अॅड. आंबेडकरांचा काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसवर असलेला रोष सर्वश्रुत आहे. त्यामुळे ते या दोन्ही पक्षांसोबत आघाडी करण्यास कधीही इच्छुक होत नाहीत. ते जाणीवपूर्वक तडजोड होऊ शकणार नाहीत, अशा अटी टाकतात. परिणामी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपा-सेनेला होतो, असा आरोप अॅड. आंबेडकर यांच्यावर सातत्याने होत आला आहे. या पृष्ठभूमीवर भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडीचे संकेत देत आंबेडकरांबाबत सकारात्मकता दाखविल्याने महाआघाडीत आंबेडकरांच्या प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने वेळोवळी आपल्या व्यासपीठावरून त्यांच्या सहभागाबद्दल प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही दिली. दरम्यानच्या काळात अॅड. आंबेडकर यांनी ‘एमआयएम’सोबत मैत्री जाहीर केल्याने काँग्र्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली व महाआघाडीच्या प्रयत्नांमध्ये एमआयएमचा अडसर निर्माण झाला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आंबेडकर चालतील; पण ‘एमआयएम’ नको, असे जाहीरपणे स्पष्ट करताच अॅड. आंबेडकरांनी राष्टÑवादीवर शरसंधान करीत आम्हाला राष्टÑवादी नको, अशी भूमिका जाहीर केली. गुरुवार, १३ डिसेंबर रोजी नागपुरात झालेल्या मेळाव्यातही ‘एमआयएम’ची सोबत सोडणार नाही, असेच त्यांनी स्पष्ट केल्यामुळे महाआघाडी निर्माण होण्यापूर्वीच बिघाडीचे बीजारोपण झाल्याचे स्पष्ट झाले.अॅड. आंबेडकर यांनी ‘बहुजन वंचित आघाडीच्या’ बॅनरखाली काँग्रेसला लोकसभेच्या १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्ताव काँग्रेस मान्य करेल, अशी स्थिती नाही. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आक्रमक झाली असून, बुलडाण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत विदर्भातील चार मतदारसंघांवर दावा करण्याचे ठरविण्यात आले आहे. हातकणंगले, माढा व विदर्भातील वर्धा व बुलडाणा या चार मतदारसंघांबाबत राजू शेट्टी आग्रही आहेत. यापैकी हातकंणगलेमध्ये ते स्वत:, वर्ध्यात माजी मंत्री सुबोध मोहिते व बुलडाण्यात रविकांत तुपकर असे त्यांचे उमेदवारही ठरले आहेत. माढा मतदारसंघात स्वाभिमानीने जोरदार टक्कर देत मोहिते पाटलांचा गड हादरवला होता. अवघ्या २५ हजार मतांनी स्वाभिमानीचा पराभव झाला होता, त्यामुळे या चार मतदारसंघांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना तडजोड करण्याची शक्यता दिसत नाही. महाआघाडीतील संभाव्य घटकपक्षांच्या मागण्या लक्षात घेता पाच राज्यांतील निवडणुकीमुळे रिचार्ज झालेली काँग्रेस या मागण्या मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे महाआघाडीचे बारा वाजतील, हेच संकेत सध्या तरी मिळत आहेत.
कोणाला किती जागा हव्यात?महाराष्टÑात लोकसभेच्या ४८ जागांपैकी काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष २६ तर राष्टÑवादी व त्याचे सहकारी पक्ष २२ जागा लढवितात. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चार अॅड. आंबेडकरांना १२, शेकाप, सीपीएम, सीपीआय, समाजवादी पक्ष या घटकपक्षांच्याही मागण्या आहेतच, त्यामुळे घटकपक्षांच्या अटी-शर्तीमध्ये आघाडीचेच बारा वाजण्यास वेळ लागणार नाही.