संजय उमक मूर्तिजापूर (जि. अकाेला) : तालुक्याच्या सीमेवरील ऋणमोचन येथे मुद्गलेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या आजीचा पूर्णा नदीच्या काठावरील घाटावरून पाय घसरून त्या पूर्णेच्या प्रवाहात वाहत गेल्या; मात्र दैव बलवत्तर म्हणून आजीला २० तासानंतर वाचविण्यात यश आले. ६७ वर्षे वयाच्या आजीने त्या रात्री जीवन-मरणाचा थरार अनुभवला. अख्खी रात्र नदी पात्रात त्यांनी जागून काढली.
आपोती येथील वत्सलाबाई शेषराव राणे या २१ जुलै रोजी भातकुली येथील बहिणीच्या मुलाकडे होत्या. वाटेतच मुद्गलेश्वराच्या दर्शनासाठी त्या थांबल्या. प्रसाद विसर्जनासाठी घाटावर उतरताना पाय घसरल्याने त्या थेट नदीपात्रात पडल्या. नदीच्या प्रवाहात त्या वाहत असल्याचे एका युवकाच्या लक्षात आले. त्याने आजीला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
संपल्या हाेत्या आशा! २१ जुलै रोजी ४ वाजता वाहून गेलेली आजी आता जिवंत मिळणार, याची आशाच उरली नव्हती. त्यामुळे मृतदेह वाहून आला तर तो आपण पकडू, यासाठी ऐंडली येथील पुलावर बसून मृतदेहाची नागरिक रात्री वाट पाहत बसले हाेते.
पुराच्या पाण्यातील झुडूप पकडून मृत्यूला परतवलेआजीच्या हातात काही अंतरावरच पुराच्या पाण्यातील झुडूप लागले. तिने तेव्हापासून तर २२ जुलै रोजी दुपारी १२ पर्यंत ते धरून ठेवले. ती किर्र अंधारी रात्र आजीने जीव मुठीत धरून पाण्यातच काढली. दुसऱ्या दिवशी शेतात जाणाऱ्या काही नागरिकांना आजीने हाक दिली. तेव्हा आजी नदीतच अडकून पडली असून, ती जिवंत असल्याने ऐंडली येथील युवकांना बोलावून आजीला सुखरूप बाहेर काढले.