संतोषकुमार गवई
पातूर : गेल्या दोन महिन्यांपासून संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना अनुदान थकल्याने वृद्ध, गोरगरीब वंचित लाभार्थी संकटात सापडले आहेत. तालुक्यातील श्रावण बाळ योजनेतील ५०९९ व संजय गांधी निराधार योजनेतील २६५६ लाभार्थी आहेत. वयोवृद्ध निराधार, गोरगरीब, विधवा परितक्त्या अपंग लाभार्थींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळणारे अनुदान अद्यापही प्राप्त झाले नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत.
श्रावण बाळ योजनेतील पाच हजार ९९ लाभार्थ्यांपैकी अनुसूचित जाती-जमातींच्या लाभार्थी वगळता उर्वरित तीन हजार ८५५ लाभार्थींचे अनुदान अद्यापही शासनाकडून प्राप्त झाले नाही. तसेच लाभार्थींना वाटप करण्यात आलेले नाही. संजय गांधी निराधार योजनेतील दोन हजार ६५६ लाभार्थ्यांपैकी अनुसूचित जातीच्या ४३३ लाभार्थ्यांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही.
गेल्या दीड वर्षापासून शासनस्तरावरून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे अनुदान अनियमित स्वरूपाचे मिळत असल्यामुळे जगावे की मरावे, अशी व्यथा गरजू लाभार्थींची झाली आहे. तालुक्यात जवळपास आठ हजार लाभार्थीं आर्थिक संकटात सापडले आहेत. लाभार्थी पातूर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गरजू आणि गरीब नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.
-------------------
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे जुलै महिन्याचे शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे. ऑगस्ट महिन्याचे अनुदान शासनाकडून मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
-जी. एम. डाहोरे, नायब तहसीलदार, पातूर.