स्व.बाजीराव पाटील साहित्यनगरी (अकोला) : विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाद्वारा दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन येथील स्व.बाजीराव पाटील साहित्यनगरी, प्रभात स्कूलच्या प्रांगणात होत आहे.
शनिवारी (५ नोव्हेंबर) रोजी सकाळी राष्ट्रगौरव दिंडी ग्रंथ दिंडी काढण्यात येऊन या साहित्य संमेलनाची थाटात सुरुवात झाली. ग्रंथ दिंडीत भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. साहित्यिक प्रदीप दाते यांच्या हस्ते ग्रंथ दिंडी, साहित्य दालन, प्रकाशन मंच, कवी कट्टा, गझल कट्टा व वऱ्हाडी कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप, युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या दोन दिवसीय युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अरविंद जगतापभूषविणार आहेत, तर नाशिक येथील युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, प्रमुख उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्त अमरावती आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप पांढरपट्टे, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर व स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे असणार आहेत. या साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉ.गजानन नारे, समन्वयक सीमा शेटे व विदर्भ साहित्य संघ आणि सहयोगी संस्थांद्वारा करण्यात आले आहे. ‘युवापिढी सध्या काय वाचतेय?’दुपारी १ वाजता ‘युवापिढी सध्या काय वाचतेय?’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संतोष अरसोड (यवतमाळ), नितीन नायगावकर (नागपूर), चंद्रकांत झटाले (अकोला), ॲड.कोमल हरणे (अकोला), मैत्री नरेंद्र लांजेवार (बुलडाणा) यांचा सहभाग असणार आहे, तर परिसंवादाचे अध्यक्षपद ऐश्वर्य पाटेकर भूषविणार आहेत. त्यानंतर, निमंत्रितांचे काव्यसंमेलन रंगणार असून, विदर्भासह महाराष्ट्रातून आलेले निमंत्रित कवी त्यांचे काव्य सादर करणार आहेत. कविसंमेलनाचे अध्यक्षपद डॉ.विशाल इंगोले भूषविणार आहेत, तर बहारदार सूत्रसंचालन किशोर बळी करणार आहेत.