अकोला: राज्यातील एकूण १६५ केंद्रीय आश्रमशाळांना २0 टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय झाला असून, राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांना शाळा संहितेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील २८८ केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान मिळावे, यासाठी शिक्षक संघटनांकडून सातत्याने मागणी होत होती. शासनाने २८८ पैकी अ व ब वर्गवारीतील १६५ केंद्रीय आश्रमशाळांना २0 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.राज्यातील केंद्रीय आश्रमशाळा अनेक वर्षांपासून अनुदानापासून वंचित होत्या. शेकडो शिक्षक अनेक वर्षांपासून बिनपगारी आश्रमशाळांवर काम करीत आहेत. वेतन नसल्यामुळे शिक्षकांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान देण्यात यावे. यासाठी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शासन दरबारी हा प्रश्न उचलून धरला आणि या बाबीचा सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी त्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे, आदिवासी विकास मंत्र्यांचीसुद्धा भेट घेतली आणि त्यांना केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान वितरित करण्याची मागणी केली. अखेर राज्यातील १६५ केंद्रीय आश्रमशाळांना २0 टक्के अनुदान देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला, तसेच आदिवासी आश्रमशाळा संहिता दुरुस्त करण्यात यावी, यासाठीही प्रयत्न सुरू होते. अखेर आदिवासी विकास विभागाने शासकीय व अनुदानित आश्रमशाळांसाठी शाळा संहितासुद्धा लागू केली आहे. या निर्णयामुळे केंद्रीय आश्रमशाळांमधील शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)