ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना!
अकोला : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते; मात्र अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. गतवर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली हाेती. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आहे.
लिंबाची मागणी वाढली!
अकोला : लिंबांमध्ये व्हिटामिन सी जीवनसत्त्व असून ते रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे लिंबाची मागणी वाढली असून दुकाने सजली आहेत.
शहरात बांधकामांना आला वेग
अकोला : शहरातील विविध भागांमध्ये जवळपास २०० कोटींची बांधकामे मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. निर्बंधांमुळे ही बांधकामे बंद पडली होती. मात्र गत काही दिवसांपासून निर्बंधात सूट मिळाल्याने बांधकामांना वेग आला आहे. बहुतांश व्यावसायिक हातातील बांधकाम पूर्ण करण्याकडे लागले आहेत.
बस सुरू करण्याची मागणी
अकोला : अनेक गावांसाठी बस सुरू नसल्याने लोकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. या वाहनांच्या वेळा निश्चित नाही. त्यामुळे ताटकळत राहावे लागते. ज्येष्ठ नागरिक, पासधारकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
रिकाम्या जागेत साचले पाणी
अकोला : शहरात मंगळवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत होते; मात्र या पावसामुळे शहरातील रिकाम्या जागांमध्ये पाणी साचले आहे. परिणामी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लांब पल्ल्याच्या बसना प्रवासी मिळेनात!
अकोला : येथील आगार क्रमांक २ मधून पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी बस सुरू आहे, परंतु या लांब पल्ल्याच्या बसना प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक बस कमी प्रवाशांवर सुरू आहेत.
नाला नसल्याने पंचाईत
अकोला : शहरातील माधव नगरासह आजूबाजूच्या परिसरात नाले बांधण्यात न आल्याने नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे. घरातील व पावसाचे पाणी रस्त्यांवर साचत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.