- राजरत्न सिरसाट (अकोला)
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कापणीपश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाने कांदा प्रतवारी यंत्र विकसित केले असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे यंत्र फायद्याचे ठरत आहे.
देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते. एकट्या नाशिक जिल्ह्यात ७० टक्केकांदा पीक घेतले जाते. पण कांदा काढल्यानंतर त्यास योग्य ती किंमत मिळत नाही. याची अनेक कारणे असली, तरी प्रतवारी नसणे हे प्रमुख कारण आहे. कांदा काढल्यानंतर लहान-मोठे कांदे वेगवेगळे काढणे हे मोठे जिकिरीचे काम असते. त्यासाठी मजूरही मिळत नाही.
मजुरांच्या साहाय्याने प्रतवारी करताना अनेक अडचणी येतात. प्रत्येक कांद्याची हाताळणी जास्त वेळा झाल्यामुळे टरफले निघतात. कांदे सुकून कमी होतात, तसेच आयुष्यमान कमी होते. कांदा हाताळावा लागत असल्याने खर्चही वाढतो. बाजारातील कांद्याचे मूल्य कमी होते. शिवाय सर्व मजूर एकाच प्रकारे प्रतवारी करतील याची खात्री नसल्याने बाजारपेठेचे आवश्यकतेनुसार प्रतवारी करून योग्य पॅकिंगमध्ये बाजारात पाठविल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिक चांगला भाव मिळतो, तसेच कांदा निर्यातीकरिता प्रतवारी करणे आवश्यक असल्याने या कृषी विद्यापीठाने कांदा प्रतवारी यंत्र विकसित करण्यात यश मिळविले आहे.
कांदा प्रतवारी यंत्रामध्ये मोठा, मध्यम आणि गोल्टी, अशी तीन प्रकारची प्रतवारी करता येते. कांदा टाकल्यानंतर त्याच्यातून अगोदरच टरफले, पालापाचोळा पंख्याच्या साहाय्याने आपोआप वेगळाकेला जातो. सुरुवातीला गोल्टी कांदा बाहेर पडतो. त्यानंतर मध्यम व मोठा कांदा निघतो. ही प्रतवारी घरच्या घरी करता येते, हे विशेष. हे यंत्र थ्री फेज विद्युत मोटरवर चालते.