- राजरत्न सिरसाट ( अकोला)
अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हळद कापणी उपकरण बनविले आहे. या उपकरणाने हळद काप अत्यंत सुलभ पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे उपकरण वरदान ठरत आहे.
राज्यात हळदीचे क्षेत्र वाढत आहे. चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल हळद पिकाकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, हळद शेतातून काढल्यानंतर त्यावर प्रक्रिया करणे अत्यंत अवघड काम आहे. हळद वाळविण्यासाठी त्याचे काप करणे आवश्यक आहे. मात्र, हे काम अत्यंत अडचणीचे ठरत असल्याने कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाने हळद काप उपकरण विकसित केले आहे. कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे उपकरण विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हळद काप उपकरण एक अश्वशक्ती सिंगल फेज विद्युत मोटरवर चालते. एका तासात या यंत्राणे ३५० ते ४०० किलो हळदीचे काप करता येतात. हळद वाळविण्यासाठी काप करणे आवश्यक असल्याने या यंत्राद्वारे विविध जाडीचे काप तयार करता येतात. नुसत्या हळदीचेच काप या यंत्राद्वारे केले जात नाही तर, बटाटे, अद्रक तसेच कांद्याचे काप तथा शेट्स करण्यासाठीसुद्धा या विकसित हळद काप यंत्राचा उपयोग करता येतो.
यंत्राची काप करण्याची क्षमता ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे हळद कापताना या उपकरणामुळे कसलेही नुकसान होत नाही. हे यंत्र हाताळण्यासाठी सुलभ असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सोयीचे आहे. या यंत्रामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून, अनेक शेतकऱ्यांनी या यंत्राचा वापर सुरू केलेला आहे.