- राजरत्न शिरसाट (अकोला)
हरभऱ्याचे टरफल आता यंत्राद्वारे काढता येईल, असे यंत्र अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे; या यंत्राला ज्वॉइंट अॅग्रोस्कोचीे मान्यता प्राप्त झाली असल्याने शेतकऱ्यांना या यंत्राचा मोठा फायदा होत आहे.
रब्बी हंगामात बाजारात मोठ्या प्रमाणात ओला हरभरा विक्रीस येतो. यात काबुलीसह गावरान हरभरा शेतकरी, व्यापारी आणणात. गावठी हरभरा खारवट, आंबट असल्याने झाडे धुवून विक्री करावी लागते. यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पर्याय शोधला असून, हरभऱ्याचे घाटे सोलणारे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राने हरभऱ्याचे टरफल काढणे सोपे झाल्याने शेतकरी, छोट्या भाजीपाला विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात हिरवे दाणे विकता येतील. याच यंत्राने वाटाण्याच्या शेंगेतून दाणेदेखील काढता येतात.
हरभऱ्यासंदर्भात मागणी मोठी असल्याने कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी कापणीपश्चात तंत्रज्ञान विभागाने मागील एक वर्षापासून हरभरा टरफल काढणी यंत्र संशोधन हाती घेतले होते. संशोधनाचे काम मागील वर्षी पुर्ण झाले. राज्यस्तरीय संशोधन आढावा (ज्वाइंट अॅग्रोस्को )समितीसमोर या यंत्राचे सादरीकरण केल्यानंतर २०१७-१८ च्या सभेत या यंत्राला मान्यता प्राप्त झाली आहे.
विद्यापीठाच्या कापणी पश्चात तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांनी हे यंत्र विकसित केले आहे. यंत्राची तोडणी कार्यक्षमता ८५ टक्के असून, एका जागेवरू न दुसऱ्या जागेवर स्थलांतरीत करणे सोपे आहे. अकुशल मजूरही यंत्र चालवू शकतो. यंत्राचीहिरव्या हरबऱ्याचे गाठी तोडणी क्षमता ११ किलो प्रतितास आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यात रब्बी हंगामात हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील शेतकऱ्यांना हे यंत्र मोठे वरदान ठरत असून घाटे काढणे अगदी सोपे झाले आहे.