संतोष येलकर अकोला, दि. 0९: जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जुलै अखेर जिल्ह्यात ३६ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरविनाच पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, पाणी पुरवठय़ात नियमित व गुणवत्तापूर्ण ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याच्या कामात संबंधित ग्रामपंचायतींकडून कुचराई होत असल्याची बाब समोर येत आहे.गावात स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठय़ात नियमित व गुणवत्तापूर्ण ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. गत जुलैमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आरोग्य कर्मचार्यांनी गृहभेटीद्वारे केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील सातपैकी चार तालुक्यात २५ ग्रामपंचायती अंतर्गत ३६ गावांमध्ये पाणीपुरवठय़ात ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यासाठी ब्लिचिंग पावडरच उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी नियमित ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांमार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात येतात; मात्र वारंवार निर्देश देऊनही ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याने, पाणी पुरवठय़ात ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याच्या कामात संबंधित ग्रामपंचायतींकडून कुचराई करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘ब्लिचिंग पावडर’ च्या वापरात ग्रामपंचायतींची कुचराई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2016 1:13 AM