प्रदीप गावंडे
निहिदा : पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा विभाग आहे; मात्र महान पाटबंधारे विभागाचा कारभार ढेपाळल्याने शेतकरी वैतागले आहेत. पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचारी नेहमीच गैरहजर राहत असल्याने कार्यालयात रिकाम्या खुर्च्या दिसून येतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
महान पाटबंधारे विभागाअंतर्गत पिंजर, निहिदा परिसरातील पिंपळगाव चांभारे, पिंपळगाव हांडे, ईसापूर, सावरखेड, जनुना, मोझर खुर्द, घोटा, कानडी बाजार, घोंगा, मोरहळ असे दहा तलाव आहेत. या तलावातील पाण्याचा उपयोग शेतकरी सिंचनासाठी करतात. परिसरातील शेतीसाठी शेतकऱ्यांना कॅनोलच्या माध्यमातून पाणी पुरविण्याची जबाबदारी संबंधित शाखा अभियंत्यांची आहे; मात्र महान पाटबंधारे कार्यालयात अधिकारीच गैरहजर राहत असल्याने तसे होत नाही. याबाबत तक्रार देऊनही परिस्थिती जैसे थे असल्याने शेतकरी वैतागले आहेत. तलावाची दुरुस्ती करणे, तलावातील गाळ काढणे, त्या गाळाची विल्हेवाट लावणे, परिसर स्वच्छ ठेवणे, कॅनॉलची दुरुस्ती करणे, शेतकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा करणे, शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेणे, अवैध कनेक्शन धारकाविरुद्ध कारवाई करणे, आदी जबाबदाऱ्या विभागाकडे आहे; मात्र कारभार ढेपाळल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.
-------------------------------------------------
महान पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चौकशी करतो. त्वरित शेतकऱ्यांच्या समस्या दूर केल्या जातील.
- जयंत पाटील, जलसंपदा व पाटबंधारे मंत्री मुबई
--------------------------------------------
कानडी येथील तलावातून पात्र शेतकऱ्यांना नियमित पाणी मिळत नाही, अवैध कनेक्शन भरपूर असल्याने उपसा जास्त आहे. अधिकारी पाहणी करीत नसल्याने स्थिती बिकट आहे.
-डॉ. नरेश लोडम, शेतकरी, कानडी.
--------------------------------------------
सिंचनासाठी पाणी व्यवस्थित मिळत नाही, कॅनॉलची दुरुस्ती होत नाही. तसेच कार्यालयात अधिकारी गैरहजर असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
-विकास आनंदराव जाधव, शेतकरी, खेर्डा खुर्द.
------------------------------
महान पाटबंधारे विभागात अधिकारी, कर्मचारी नेहमी गैरहजर असतात. याबाबत विचारणा केली असता शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. वरिष्ठांनी लक्ष देऊन मुख्यालयी राहणारा अधिकारी द्यावा.
-किरण सतीश गावंडे, महिला शेतकरी तथा मा. प. स. सदस्या.