अकोला, दि. 27 - 'लोकमत'ने केलेला पाठपुरावा आणि खासदार संजय धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नांती 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोल्यात 27 आणि 28 जुलै असा दोन दिवसांचा थांबा मिळाला. यातील पहिल्या दिवशी 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोलेकरांचा अभुतपुर्व प्रतिसाद लाभला. 27 जुलै रोजी 28 हजार आठशे विद्यार्थ्यांनी 'सायन्स एक्सप्रेस'ला भेट दिली.
जागतिक पर्यावरण बदलावर आधारित 16 वातानुकूलित डब्यातील वैज्ञानिक प्रदर्शन पाहण्याचा एक आगळा वेगळा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 वर थांबलेल्या 'सायन्स एक्सप्रेस'चे सकाळी 10 वाजता औपचारिक उदघाटन झाले. यावेळी जी.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती, मध्य रेल्वे डीआरयुसीसी सदस्य बसंतकुमार बाछुका, रेल्वेस्थनाक प्रबंधक जी.पी.मिणा, उद्भव सांगळे यांच्यासह विभागीय आणि स्थानिक रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
भेट देणाऱ्यांमध्ये शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांचा समावेश होता. यानिमित्त रेल्वेस्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रेल्वेस्थानकावर येणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अकोला भाजप च्यावतीने परिसरात विशेष बूथ उघडण्यात आले होते. तर अकोला रोटरी क्लबच्या वतीने तहानलेल्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अकोलेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल 'सायन्स एक्सप्रेस'चे मुख व्यवस्थापक नितीन तिवाने यांनी 'लोकमत'कडे समाधान व्यक्त केले. 28 जुलै रोजी देखील सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत हे प्रदेर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.