अकाेला : काेराेना विषाणूचा मुकाबला करताना वैद्यकीय आराेग्य यंत्रणा, आराेग्य विभाग व गृहविभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आल्याची परिस्थिती आहे. संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी या विभागाने केलेल्या उपाययाेजना व धावपळ लक्षात घेता उपराेक्त विभागातील एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के रिक्त पदभरतीसाठी शासनाने हिरवी झेंडी देताच विभागीय स्तरावर प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. देशासह राज्यात काेराेनाचा सामना करण्यासाठी गृहविभाग, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य यंत्रणा एकदिलाने सरसावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणेने आटाेकाट प्रयत्न केल्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले; परंतु अद्यापही ही साथ कायम असून, संभाव्य साथीचा मुकाबला करण्याच्या निमित्ताने का हाेईना, शासनाने गृहविभाग, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य यंत्रणेत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी एकूण रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदांसाठी भरती राबविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय नाेकऱ्यांमधील मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश देत उपराेक्त पदांसाठी बिंदुनामावलीनुसार मंजूर पदांसाठी पदभरती करण्याचे निर्देश जारी केले आहेत.
लहान संवर्गातील पदभरतीला प्राधान्य
गृह, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य विभागातील वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांचा संवर्ग वगळता लहान संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदभरतीला प्राधान्य देण्यात आले आहे. तसे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. शासनाच्या निर्णयामुळे सुशिक्षित बेराेजगार तरुणांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.