अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करून महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच साजरी करून बाबासाहेबांना घरीच अभिवादन करण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्या वतीने गुरुवारी करण्यात आले.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शासन व प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले असून, जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून १४ एप्रिल रोजी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने घरातच साजरी करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि १४ एप्रिल रोजी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी.जे. वानखडे व जिल्हा महासचिव प्रा.डाॅ. एम.आर. इंगळे यांनी केले आहे.