अकोला: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शुक्रवारी जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने अकोला शहरात अभिवादन रॅली काढून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी अकोल्यातील अशोक वाटिका येथे भारतीय बौद्ध महासभा व भारिप-बमसंच्यावतीने सामुदायिक वंदना घेण्यात आली. भगवान गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्प अर्पण केल्यानंतर सामुदायिक त्रिशरण-पंचशील ग्रहण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांसह बौद्ध उपासक-उपासिका आणि आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. सामुदायिक वंदनेनंतर अशोक वाटिका येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत,मध्यवर्ती बसस्थानक, टॉवर चौक, रेल्वे स्टेशन, टिळक रोड, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून मार्गक्रमण करीत अशोक वाटिका येथे अभिवादन रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये आमदार बळीराम सिरस्कार, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे,डी.एन.खंडारे, बौद्धाचार्य राहुल अहिरे, माजी मंत्री डॉ.डी.एम.भांडे, राजाभाऊ लबडे, डॉ.प्रसन्नजित गवई, सुभाष रौंदळे, अरुंधती शिरसाट, नगरसेविका अॅड.धनश्री अभ्यंकर (देव), किरण बोराखडे, राजुमिया देशमुख, रामा तायडे, बुद्धरत्न इंगोले, पराग गवई, मुकुंद गायकवाड, अशोक शिरसाट, भीमराव खंडारे, गजानन गवई, लखन घाटोळे, देवानंद खडे, वंदना वासनिक, प्रतिभा अवचार, मनोरमा गवई, प्रभा शिरसाट, भाऊसाहेब इंगळे, अजय शेगोकार, शरद गवई, मनोहर शेळके, बी.डी.वानखडे, दामोदर सरदार, आकाश अहिरे, अविनाश पाखरे, नितीन प्रधान, संदीप गवई यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा व भारिप-बमसं व समता सैनिक दलाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व संस्थांच्यावतीने अशोक वाटिकेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. राजकीय पुढाऱ्यांसह समाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका व इतर शासकीय कार्यालयांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध कार्यक्रमांद्वारे महामानव डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.