अकोला, दि. ६- महापालिकेच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणार्यांविरोधात तक्रारी करण्यासाठी निवडणूक आयोगाने ह्यकॉपह्ण मोबाइल अँप तयार केले. मोबाइल अँपच्या तक्रारीवर विसंबून न राहता महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मनपाच्या स्तरावर आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार स्वीकारण्यासाठी मनपात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित केला आहे. सोमवारी हा कक्ष सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामाला सुरुवात झाली असून राजकीय पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवार कामाला लागले आहेत. उद्या मंगळवारी निवडणूक रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीच्या मैदानात कायम राहणारे उमेदवार प्रचारादरम्यान धुराळा उडवतील, हे नक्की. उमेदवारी अर्ज कायम ठेवणार्या उमेदवारांकडून राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, बैठकांचा धडाका सुरू होतो. त्यावेळी मतदारांना प्रलोभन दाखविणे, साहित्याचे वाटप करणे आदी प्रकार घडण्याची शक्यता आहे. ही बाब आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरणारी आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणार्या उमेदवारांच्या विरोधात सहसा कोणी तक्रार करीत नसल्याचा अनुभव आहे. अशा उमेदवारांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मनपा आवारात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. हा कक्ष अकोलेकरांसाठी सोमवार पासून खुला करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग असेल किंवा मनपा निवडणुकीसंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास ती स्वीकारल्या जाणार आहे. अकोलेकरांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तक्रार निवारण कक्षात रीतसर तक्रार दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अकोला महापालिकेत तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित
By admin | Published: February 07, 2017 3:22 AM