अकोला : देशभरात कोरोनाचा कहर झाल्याने गत २२ मार्चपासून राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही, असे जरी शासनाकडून बोलले जात असले तरी सर्वसामान्य माणसाचे दोन्हीकडून मरण होत आहे. घरात डाळदाणा भरण्यासाठी नागरिक जेव्हा किराणा दुकानांवर पोहोचत आहे, तेव्हा त्यांना लुटीचा सामना करावा लागत आहे. तूर डाळ तर चक्क १२५ रुपये किलोच्या दरापर्यंत विकल्या जात आहे. कोराना संचारबंदीच्या नावाने होणारी लूट थांबवून जिल्हा पुरवठा विभागाने अन्न, धान्य आणि किराणाचे दर निश्चित करावेत, अशी मागणी जनतेकडून व्यक्त होत आहे.
असे झाले भाव...८०-८५ किलो रुपयांनी विकल्या जाणारी तूर डाळ चिल्लरमध्ये १२५ रुपये किलोच्या दराने विकल्या जात आहे. ३८ रुपये किलो विकल्या जाणारी साखर ४०-४२ रुपये किलो झाली आहे. ७८-८० रुपये किलोचे तेल आता शंभरी पार गेले आहे. मूग, उडीद, चणा, तांदूळ, गव्हाच्या भावातही मोठी वाढ झाली आहे.बड्या कंपनीची साठेबाजीएनसीडीईएक्ससह इतर काही मोठ्या कंपन्यांनी ही भाववाढ केल्याचे व्यापारी आणि दुकानदारांचे म्हणणे आहे. अकोला परिसरातील गोडाऊनमध्ये जवळपास ३० हजार मेट्रिक टन धान्यसाठा आहे. सोबतच इतर व्यापाऱ्यांनीदेखील मोठ्या प्रमाणात साठेबाजी केलेली आहे. या साठेबाजीतूनच संचारबंदीच्या काळात अडवणूक करून लूट केली जात आहे.
अशा काळात कुणी साठेबाजी करून नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी. एकीकडे संपूर्ण देश एकमेकांच्या मदतीसाठी धावत आहे. दुसरीकडे जर कुणी या काळाचा गैरफायदा घेऊन लुटण्याचा प्रयत्न करीत असेल तर मानवतेच्या विरोधात ही बाब आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही कारवाईची मागणी करू.- अशोक डालमिया, राष्ट्रीय सचिव, कॅट अकोला.