अकोला: यावर्षीच्या खरीप हंगामात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार असून, शेतकºयांनीदेखील त्यादृष्टीने तयारी केली आहे. भुईमुगाला यावर्षी आधारभूत किंमतदेखील वाढवून मिळाली आहे. यानुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भुईमुगावर नवे संशोधन केले आहे. भरघोस उत्पादन देणारे हे वाण लवकरच शेतकºयांना मिळणार आहे. खरीप हंगामात राज्यात अडीच ते तीन लाख हेक्टर भुईमुगाचे क्षेत्र आहे. त्या तुलनेत विदर्भात खरिपाचे कमी तर उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र सर्वाधिक आहे; परंतु यावर्षी विदर्भातदेखील खरीप भुईमूग पेरणीकडे शेतकºयांचा कल आहे. १९७० च्या दशकात विदर्भात हे प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकरी घेत होते; परंतु सोयाबीन, मका आदी पिके आल्याने तसेच भुईमुगाला दरही कमी असल्याने शेतकºयांनी या पिकाकडे दुर्लक्ष केले होते; परंतु आता पुन्हा भुईमूग पिकाकडे शेतकरी वळताना दिसत आहेत. हजारो शेतकºयांनी सोयाबीन कमी करून भुईमूग पेरणीचे नियोजन केले आहे. भुईमुगाला सध्या ५ हजार २७५ रुपये प्रति क्विंटल दर आहेत. यावर्षीच्या एमएसपीनुसार यात १८५ रुपयांची वाढ झाली आहे. शेतकºयांसाठी ही सकारात्मक बाब आहे. यावर्षी शेतकºयांनी सोयाबीनसोबत भुईमूग पेरणीचे नियोजन केले आहे. ज्यांनी दहा एकर सोयाबीन पेरणीचे नियोजन केले होते, त्यामध्ये आता २ ते ३ एकर भुईमूग लागवड केली जाणार असल्याचा विश्वास कृषी शास्त्रज्ञांना आहे. शेतकरी या दृष्टीने कृषी विद्यापीठाकडे विचारणा करीत आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने आतापर्यंत ६ ते ७ भुईमुगाच्या जाती संशोधित केल्या आहेत. टीएजी -२४, एकेए- १५९, पीडीकेव्ही-३३५, एके-२६५, ३०३ या या भुईमुगाच्या जातींचा समावेश आहे. टीएजी-२४ या बियाण्याचे उत्पादन हेक्टरी १४ ते १५ क्विंटल आहे. या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी कृषी विद्यापीठाच्या तेलबिया विभागाने एका नवीन जातीवर संशोधन केले असून, लवकरच ही जात शेतकºयांना पेरणीसाठी उपलब्ध होणार आहे. या जातीपासून १६ टक्के अधिक उत्पादन मिळणार आहे. विशेष म्हणजे, भुईमुगापासून मिळणारा चारा हा जनावरांसाठी अत्यंत उत्तम आहे. यामुळेच यावर्षी शेतकरी लागवडीचे नियोजन करीत आहेत. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञही भुईमूग बियाणे पेरणीसाठी शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत.
खरीप हंगामात विदर्भापेक्षा उर्वरित राज्यात २ लाख ५० हजार हेक्टरवर भुईमुगाचे पीक घेतले जाते. विदर्भात उन्हाळी भुईमूग मोठ्या प्रमाणात घेतला जातो; परंतु आता खरीप हंगामातही विदर्भात क्षेत्र वाढणार आहे. शेतकºयांना यासंदर्भात मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. त्यांना याबाबत मार्गदर्शनही करण्यात येत आहे.
- डॉ. मनीष लाडोळे, भुईमूग शास्त्रज्ञ, तेलबिया विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.