अकाेला : यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत, तसेच सर्वच तालुक्यातील भूजल पातळीत माेठी वाढ झाली आहे, त्यामुळे यंदा टंचाइग्रस्त गावांची संख्या कमी हाेण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात एकूण ३८ पाणलोट क्षेत्र असून, त्यामधील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे ८१ निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीची वाचने वर्षातून चार वेळा घेण्यात येतात. यावर्षी ऑक्टोबर अखेर घेण्यात आलेल्या भूजल पातळीच्या नोंदीचा आणि मागील ५ वर्षाच्या ऑक्टोबर महिन्याच्या भूजल पातळीच्या सरासरीशी तुलनात्मक अभ्यास केला असता, अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांच्या निरीक्षण विहिरीच्या भूजल पातळीत १ मीटरने वाढ झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यातील निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीत ०.२५ ते ०.७० मी. ने वाढ झालेली दिसून येते; परंतु असे असले तरी, सन २०१७ च्या भूजल मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील ३८ पाणलोट क्षेत्रांपैकी ११ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा उपसा पुनर्भरणाच्या तुलनेत ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि एका पाणलोट क्षेत्रात (पीटीएमटी-१ पातूर तालुका) १०० टक्क्यापेक्षा जास्त आहे. या १२ पाणलोट क्षेत्रात सूक्ष्म सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणे व उपस्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.
या कारणांमुळे वाढली भूजल पातळी
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मुबलक पाऊस झाला. पावसाच्या दिवसांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत झालेली वाढ भूजल पातळी वाढण्यासाठी कारणीभूत ठरली आहे तसेच या पावसामुळे शेतातील ओल कायम राहिल्याने खरिपाच्या सिंचनासाठी विहिरीद्वारे उपसा झाला नाही आणि यावर्षी दोन पावसातील खंड दिसून आला नाही.
या वर्षात झालेला मुबलक पाऊस व खरिपाच्या हंगामात न झालेला पाण्याचा उपसा यामुळे भूजल पातळीमध्ये माेठी वाढ दिसून येत आहे
- संजय कराड , वरिष्ठ भूवैज्ञानिक.