लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी पहाटे अकोट रोडवरून अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे पथक गस्तीवर असताना, पाच जणांची टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अकोट रोडवर जाऊन शोध घेतला असता, पाच संशयित इसम दरोडा घालण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली असता, त्यांची नावे अंकुश अरुण केवतकर (२३ रा. जुने शहर), राजेश साहेबराव चव्हाण (३२ रा. जुने शहर), रितेश लिंबादास मृर्दुगे (३२ रा. वाशिम बायपास), राकेश दिलीप वाडेकर (३२ रा. जुने शहर), नवीन प्रल्हाद पाली (२४ रा. जुने शहर) असल्याचे निष्पन्न झाले. पाचही जणांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे लोखंडी पाइप, मिरची पूड, दोरी, चाबीचा गुच्छ असे साहित्य मिळून आले. यावरून आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३९९, ४0२ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींनी २0१५ मध्ये इंटक कार्यालयाजवळ दरोडा घातल्याची कबुली दिली आहे. पाचही आरोपींकडून जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, शेर अली, अजय नागरे, संदीप काटकर, संतोष मेंढे, शेख हसन, संदीप टाले यांच्या पथकाने केली.
दरोड्याच्या प्रयत्नात असलेली टोळी जेरबंद !
By admin | Published: July 12, 2017 1:19 AM