अकोला: यंदा एप्रिल महिन्यातच शहराचा पारा ४७ अंशाच्या पार गेला होता. जागतिक स्तरावर याची नोंद झाली असली तरी ही बाब निश्चितच अकोलेकरांसाठी भूषणावह नाही. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड हाच एकमेव पर्याय असून, त्याचे संगोपन करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक-स्वयंसेवी संस्था, संघटनांनी एकदिलाने एकत्र येत ‘आम्ही अकोलेकर’ या चळवळीद्वारे शहरात वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याची माहिती महापालिकेचे स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यंदाच्या उन्हाळ्यात अकोला शहराचा चढलेला पारा विक्रमी ठरला. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पारा ४७ अंशाच्या पार गेला होता. उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, मागील काही वर्षांत शहराच्या तापमानात वाढ होत चालली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात वृक्ष लागवड करणे व त्यांचे संगोपन करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक-स्वयंसेवी संस्था, संघटना एकत्र आल्याची माहिती मनपाचे स्थायी समिती सभापती विनोद मापारी यांनी दिली. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट एकदिलाने साध्य करण्यासाठी ‘आम्ही अकोलेकर’ ही लोकसहभागातून चळवळ उभारण्यात आली आहे. वृक्ष लागवड केल्यानंतर ट्री-गार्डसाठी खासदार, आमदार यांचा निधी घेण्याचा प्रयत्न असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेतूनही निधीची मागणी केली जाणार आहे. प्रभागांमधील खुल्या जागा, रस्त्यालगतच्या जागेवर वृक्षारोपण केले जाणार असल्याचे सभापती मापारी यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत सहभागी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे विचार व्यक्त केले.१० हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट‘आम्ही अकोलेकरां’नी शहरात १० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यामध्ये गायत्री परिवार, प्रभाग २० मधील महिला मंडळ, निसर्ग वैभव संस्था, जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठान, आयएमए व शुभम करोती फाउंडेशन, रोटरी क्लब आॅफ अकोला अग्रेसिटी, आस्था योग फाउंडेशन, अकोला ग्रीन क्लब आर्मी, मोरेश्वर फाउंडेशन, केशव नगरवासी, हॉकी अकोला असोसिएशन, पहाट बहूद्देशीय संस्था तसेच विनोद मापारी मित्र मंडळाचा सहभाग असून, इच्छुक संघटना, निसर्गपे्रमींना सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ट्री-गार्डसाठी दानशूरांनी समोर यावे!वृक्ष लागवड करताना ट्री-गार्डची कमतरता भासण्याची शक्यता पाहता शहरातील दानशूरांनी याकामी पुढाकार घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. संबंधित व्यक्ती, संस्थेच्या नावाचा त्यावर उल्लेख केला जाईल. शहराच्या हितासाठी सर्वांनी समोर येण्याचे आवाहन करण्यात आले.संगोपनाची जबाबदारी घेऊ!मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड केल्यानंतर त्याकडे फिरकूनही पाहिल्या जात नसल्याचा अनुभव आहे. ‘आम्ही अकोलेकर’ याला अपवाद असून, वृक्षारोपण केल्यानंतर त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली जाईल. वृक्षारोपणाचे ‘जिओ टॅगिंग’ क रणार असून, ठरावीक कालावधीनंतर त्यांची पाहणी केली जाईल. तसेच उन्हाळ्यात ट्रॅक्टरद्वारे झाडांना पाणी देण्याचीही सोय करण्यात आल्याचे विनोद मापारी यांनी सांगितले.