- राजेश शेगोकार
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला उद्या, १० जून रोजी २१ वर्ष पूर्ण होत आहेत. पक्ष आता दुसऱ्या तपाच्या उंबरठ्यावर आहे. या पृष्ठभूिमवर अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारकिर्दीचा धांडोळा घेतला तर दिग्गज नेत्यांची मोठी मांदियाळी समोर येते. प्रत्येक नेत्याला स्वत:चे वलय आहे, नाव आहे, दबदबाही आहे; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळविलेल्या यशाच्या आधारावर आकड्यात बोलायचे झाले तर या पक्षाचे स्थान हे चवथ्या, पाचव्या क्रमांकावरच थांबते.गेल्या विधानसभेत लढविलेल्या दोन्ही जागा पराभूत झाल्या अन् अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये प्रत्येक निवडणुकीत पक्ष क्षीण होत गेला. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर अकोला जिल्हा परिषदेच्या २००३, २००८ आणि २०१३ अशा तीन निवडणुका झाल्यात. या तिन्ही निवडणुकीत पक्षाची कामगिरी अनुक्रमे ०८, ०३ आणि ०२ अशी निराशाजनक राहिली आहे व गेल्या निवडणुकीतही केवळ ०३ जागा मिळवून पक्ष थांबला. अशीच कमी अधिक स्थिती नगरपालिकांची आहे. दुसरीकडे सर्वच दिग्गज नेत्यांचे वास्तव्य असलेल्या अकोला शहरात महापालिकेत या पक्षाला १० जागांच्या पुढे जाता आले नाही. या पृष्ठभूमिवर आता राज्याच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला सत्तेचा लाभ थेट सामान्यापर्यंत पोहोचवित पक्ष वाढीची मोठी संधी आहे, त्यामुळेच राष्ट्रवादीने पहिल्यांदाच चाकोरीच्या बाहेरचा विचार करून अमोल मिटकरी या युवा नेत्याला विधान परिषदेवर पाठविले तर भारिप बहुजन महासंघाचे माजी आमदार हरिदास भदे व बळीराम सिरस्कार यांना पक्षात घेऊन आणखी तीन नेत्यांची भर राष्टÑवादीत घातली आहे.कुठल्याही पक्षात नेत्यांची भर पडली तर त्यांच्या कार्यकर्त्यांची बेरिज होऊन पक्ष वाढत असतोच; मात्र नव्यानेच आलेल्या नेत्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली तर जुन्या जाणत्या नेतृत्वामध्ये अस्वस्थता येतेच आणि ते सहाजिकही आहे. अशीच अस्वस्थता सध्या राष्टÑवादीतही आहे. अवघ्या वर्षभरात आ. अमोल मिटकरी यांनी घेतलेली ही झेप अजूनही अनेकांना धक्कादायक वाटते. खरे तर अजित पवार यांनी भरसभेत मिटकरी यांना दिलेला आमदारकीचा शब्द पाळला, यामुळे अजितदादा शब्द पाळतात, हे सुद्धा या निमित्ताने अधोरेखित करायचे होते. खरे तर अमोल मिटकरी यांचा सारा करिष्मा हा ‘शब्दांचाच’ खेळ आहे. त्यामुळे आता माजी आ.भदे व सिरस्कार यांना राष्ट्रवादीने कोणता शब्द दिला, हे सुद्धा लवकरच समोर येईल. अर्थात राष्ट्रवादीचे सध्याचे जिल्ह्यातील सर्व चित्र बदलण्याची पूर्ण जबाबदारी आता या नवागतांचीच आहे, असे नक्कीच नाही; मात्र या जबाबदारीमधील वाटा उचलतांनाच रिझल्टही द्यावे लागतील हेसुद्धा तेवढेच खरे. त्यामुळे जुन्या-नव्या नेत्यांनी सत्तेची ऊब घेताना पक्षालाही नव्याने उर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न केले तर नेत्यांच्या सोबतच सत्तेतील आकडेही वाढलेले असतील, तरच घड्याळाची टिकटिक वाढेल अन्यथा ते शोभेचेच ठरेल. पक्ष सत्तेत पुढे सरकत नाही; मात्र दुसरीकडे नेत्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतीच असल्याने आगामी महापािलका निवडणूक या नेत्यांना पुन्हा परीक्षेला बसविणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर अकोल्यातील राजकारणासह सहकार, कृषी, शिक्षण व सांस्कृतिक वारसा असणाºया दिग्गजांनी शरद पवारांची साथ करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. शरद पवार नावाचे वलय अन् नेत्यांची मांदियाळी पाहता हा पक्ष जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांवर झेंडा फडकवेल, असे वाटले होते; मात्र ही अपेक्षा फोल ठरली. पक्षस्थापनेनंतरच्या सर्व विधानसभा निवडणुकीत तुकाराम बिडकर यांचा अपवाद वगळला तर कोणालाही जनतेतून विधानसभेत पोहोचता आले नाही.