- संजय खांडेकरअकोला : जीएसटी पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे राज्यभरातील हजारो करदात्यांना जीएसटीआर थ्रीबी फाइल करता आले नाही. दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही समस्या निर्माण होत असल्याने त्याचा भुर्दंड मात्र हजारो उद्योजकांना सोसावा लागतो आहे. गेल्या २१ महिन्यांपासून सुरू असलेल्या या तांत्रिक लुटीमुळे उद्योजक आणि कर सल्लागार कमालीचे त्रासले असून, त्यांनी जीएसटी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर आणि जीएसटी पोर्टलवर यासंदर्भात तक्रारी नोंदविल्या आहेत.वास्तविक पाहता जीएसटीच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड असताना ‘लेट फी’ची कारवाई होऊ नये; मात्र इंटरेस्ट पेनल्टी , लेट फी मात्र उद्योजकांवर लावली जाते. मागील अनुभव लक्षात घेता, प्रत्येक महिन्याच्या ९, १०, १९, २० हे चार दिवस जीएसटीची साइट जवळ-जवळ जाम असते. कधी सर्व्हर डाउन तर कधी एरर आलेला असतो. दरम्यान, २० तारखेपर्यंत तीन रविवार होऊन गेलेले असतात. त्यात ५ तारखेपर्यंत कोणत्याही उद्योजकाचा परचेस सेल अकाउंट पूर्ण झालेला नसतो. त्यामुळे ठरवून दिलेल्या २० तारखेला जीएसटीआर थ्रीबी फाइल करणे अशक्य होते. शेवटच्या चरणात फाइलिंगची प्रक्रिया पूर्ण होत नाही. गेल्या २१ महिन्यांपासून हीच स्थिती सुरू आहे; मात्र जीएसटी पोर्टल क्षमतेत कोणतीही सुधारणा दिसत नाही. स्वत:ची क्षमता सक्षम नसताना उद्योजकांवर आईपीएल लावणे कितपत बरोबर आहे. ही लूट थांबविण्यात यावी म्हणून जीएसटी व्हॉट्स अॅप ग्रुपवर अनेक सनदी लेखापाल, कर सल्लागार आणि विधिज्ञांनी अनेक तक्रारी नोंदविल्या आहेत. जीएसटी पोर्टलवर याआधीच अनेकदा यावर ऊहापोह झाला; मात्र समस्या काही केल्याने अद्याप संपुष्टात आलेली नाही.-जीएसटीची आॅनलाइन फाइलिंग सिस्टीम ही मुख्य सर्व्हरशी जोडलेली आहे. यामध्ये आम्हाला काहीही करता येत नाही. तक्रारीसंदर्भातील आढावा वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.-डॉ. अनिल करडेकर, कर उपायुक्त, जीएसटी कार्यालय अकोला.