अकोला : जीएसटी (वस्तू आणि सेवाकर) पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे रविवारी अनेकांचे रिटर्न-बी रखडले. आॅनलाइन यंत्रणेत १९ जानेवारीच्या सकाळपासून आलेला एरर रविवार, २० जानेवारीपर्यंत कायम होता. रिटर्न-बी अपलोड करण्याची महिन्याची अंतिम तारीख २० जानेवारी असल्याने एकाच वेळी पोर्टलवर ताण आल्याने हा गोंधळ उडाला.जीएसटी पोर्टलची क्षमता कमी असल्याने वारंवार आॅनलाइन यंत्रणेत बिघाड निर्माण होते. वास्तविक पाहता ही चूक जीएसटीची असूनही त्याचा भुर्दंड मात्र उद्योजकांना भरावा लागत आहे. दर महिन्याला रिटर्न फाइल करतानाही ही समस्या येत असून, याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली आहे. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना मॅसेज पोहोचविण्यापलीकडे काहीच करता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी तक्रारीही करीत नाही.
जीएसटीचे पोर्टल सक्षम करण्यासाठी जीएसटी कौन्सिलने पुढाकार घ्यावा, ही समस्या सोडविली जात नसेल, तर किमान त्या महिन्यात विलंब शुल्क लावू नये, चूक नसताना उद्योजकांना भुर्दंड सोसावा लागत आहे.-अशोक डालमिया, राष्ट्रीय ‘कॅट’ सचिव.