अकोला : पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू शुक्रवार, १२ मार्च रोजी अकोला दौऱ्यावर येत असून, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांच्या कामाचा आढावा ते घेणार आहेत. दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे नागरी दलितेत्तर वस्ती समितीची आढावा बैठक, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा आणि त्यानंतर दुपारी ३.३० वाजता आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांच्या कामाचा आढावा पालकमंत्री घेणार आहेत.
जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा!
अकोला : हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार रविवार, १४ मार्चपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यात हलका ते मध्यम अधिक स्वरूपाचा पाऊस तसेच एक - दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.