पुसदचे कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा अतिरिक्त प्रभार कुणाला द्यावा यावरून मुख्य अभियंत्यांपुढे पेच निर्माण झाला होता. कारण उमरखेडचे एक माजी आमदार, बहुतांश कंत्राटदार हे पुसद-उमरखेड विभागातीलच एखाद्या उपअभियंत्याला हा प्रभार द्यावा म्हणून आग्रही होते. मात्र पुसदच्या सूत गिरणीतून वेगळीच चक्रे फिरविली गेली. त्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना विश्वासात घेतले गेले. त्यातूनच हे प्रकरण थेट बांधकाम राज्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर झालेल्या घडामोडीअंती यवतमाळच्या विशेष प्रकल्प विभागातील कार्यकारी अभियंत्याला पुसदचा अतिरिक्त प्रभार दिला गेला. या चेंजमुळे बहुतांश कंत्राटदार नाराज झाले. त्यांनी आता बांधकाम खात्यासह राजकीय स्तरावरही असहकार पुकारण्याची तयारी चालविली आहे. दरम्यान कंत्राटदारांनी हे प्रकरण पालकमंत्री संजय राठोड यांच्या दरबारात आणले. पुसदचा प्रभार देताना पालकमंत्र्यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे या प्रकाराबाबत त्यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. परस्पर हा निर्णय झाला कसा, नेमका कुणाचा दबाव होता, मग हाच पॅटर्न यवतमाळचा प्रभार देताना का लागू झाला नाही, अशा विविध मुद्यांवर मुख्य अभियंता कार्यालयाला पालकमंत्र्यांकडून जाब विचारला जाणार आहे. यवतमाळचा प्रभार देतानासुद्धा पालकमंत्र्यांना अशाच पद्धतीने डिवचले गेले होते. त्यांनी सूचविलेले नाव अखेरच्या क्षणी रद्द केले गेले. त्यामुळे पालकमंत्र्यांची चांगलीच नाराजी झाली होती. त्यापाठोपाठ पुसदचाही प्रकार तसाच घडल्याने ही नाराजी वाढल्याचे सांगितले जाते.
बॉक्स::::
अधीक्षक अभियंता उमरखेडमध्ये
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार बुधवारी उमरखेड विभागात दौऱ्यावर होते. रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम अभियंते व कंत्राटदारांना केल्या. ३० पैकी अवघ्या चार ते पाच कंत्राटदारांनी खड्डे बुजविल्याने खुद्द अधीक्षक अभियंत्यांना उमरखेडमध्ये रस्त्यांच्या पाहणीसाठी यावे लागल्याचे सांगितले जाते.