- राजेश शेगोकार
अकोला: तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाच्या पाण्यावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पातून बाळापूर विधानसभा मतदारसंघातील ६४ गावांसाठी आमदार नितीन देशमुख यांनी शासनाकडे एक योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेमुळे वानच्या पाण्यातील वाटेकरी वाढेल आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही या भीतीपोटी सध्या तेल्हारा तालुक्यातील शेतकरी राजकीय पक्ष व विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पृष्ठभूमीवर अकोल्याचे पालकमंत्री व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वान प्रकल्पावरून भविष्यात कोणतीही योजना नको, असे पत्र कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. यामुळे महाविकास आघाडीतील नामदार आणि आमदार यांच्यामध्ये आता वानच्या पाण्यावरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. बाळापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सध्या मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवत विविध योजना व निधी आणण्याचा सपाटा लावला आहे. कुठल्याही आमदारांना आपल्या मतदारसंघाची काळजी असणे स्वाभाविकच आहे; मात्र आमदार देशमुख हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असल्याने त्यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीला थेट अंगावर घेतले आहे. यापूर्वी अकोला महापालिकेत २० कोटीचा निधी वळवण्याचे प्रकरण असो की महापालिकेतील विविध प्रश्नांवर भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न असो, त्यांनी भाजपवर मात करण्याची संधी सोडली नाही. वानच्या पाण्याचा मुद्दाही याच अनुषंगाने महत्त्वाचा ठरतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांनी वानच्या पाण्याचा प्रश्न प्रतिष्ठेचा करून अकोला शहरासाठी असलेले आरक्षण रद्द करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली होती. आता त्यांच्याच मतदारसंघातील प्रकल्पावरून बाळापूरसाठी पाणी पुरवठा योजना प्रस्तावित होत असल्याने शिवसेना आणि भाजपा असा सामना रंगला आहे. यामध्ये पालकमंत्री बच्चू कडू यांची भर पडली आहे. मुळातच बच्चू कडू हे अकोल्याचे पालकमंत्री असले, तरी त्यांचे सर्वाधिक प्रेम हे अकोट मतदारसंघावरच राहिले आहे. त्यांच्या प्रहार संघटनेची ताकदही याच मतदारसंघात सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांनीही मतदारसंघातील लोकांच्या भावना लक्षात घेऊन वान पाण्यावर आरक्षण नको, अशी भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे दोन दिग्गज लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये यानिमित्ताने सामना रंगणार असून, भारतीय जनता पार्टी यामध्ये तेल टाकण्याचे काम करणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
अशी आहे प्रस्तावित योजना
बाळापूर व अकाेला तालुक्यातील ५३ गावे व अकोला तालुक्यातील १६ गावे असे एकूण ६९ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली. या याेजनेत वसेगाव निंबी, हिंगणा, बहादुरा, कवठा, लाेहारा, डाेंगरगाव, कळवा, कळवी, स्वरूपखेड, जनाेरी मेळ, माेखा, दगडखेड, नागद, सागद, कारंजा (रम), अंत्री, उरळ आदी ६९ गावांचा समावेश आहे.
असे वानमधील आरक्षण
१)अकाेट शहर पाणी पुरवठा याेजना:-८.६६ दलघमी २)तेल्हारा शहर पाणी पुरवठा याेजना:-३.१६ दलघमी ३)जळगाव जामाेद पाणी पुरवठा याेजना:-४.०२ दलघमी ४)८४ खेठी पाणी पुरवठा याेजना:- ४.२३९ दलघमी ५)शेगाव शहर पाणी पुरवठा याेजना:-५.६२ दलघमी ६)जळगाव ता. १४० खेडी पाणी पुरवठा याेजना:-८.४५४ दलघमी ७) तेल्हारा-अकाेट तालुका १५९ प्रादेशिक पाणी पुरवठा याेजना:-३.७५३ दलघमी ८) अकाेला शहर अमृत पाणी पुरवठा याेजना:-२४.०० दलघमी ९) ‘६९ याेजने’नेला ४.५८ दलघमी पाणी लागणार आहे.
बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी योजना प्रस्तावित केली आहे. हे पाणी कुठल्याही उद्योगासाठी नाही. त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील जनतेने संभ्रमित होऊ नये. शेतकरी जगला तरच शेती आणि सिंचन याची चर्चा होऊ शकते. पिण्याचे पाणी आणि सर्वात महत्वाचे आहे. या प्रकल्पातून अकोला शहरासाठी पाणी आरक्षित असले तरी त्याची उचल होत नाही. त्यामुळे आमचा प्रस्ताव जास्त योग्य असल्याने तो मंजूर होईल, असा विश्वास आहे.
- नितीन देशमुख आमदार बाळापूर