अकोला : आपल्या अनोख्या कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी चक्क वेशांतर अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कारभाराचा धांडोळा घेतला. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वस्त धान्य दुकानांही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होतो की कसे, याबाबत माहिती घेतली.
बच्चू कडू यांनी युसुफखाँ पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला. विविध विभागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात नसल्याने त्यांच्या स्विय सहायकाशी त्यांनी संवाद साधला. विशेष म्हणजे एकही मनपा कर्मचारी बच्चू कडू यांना ओळखू शकला नाही. ते निघून गेल्यानंतर मात्र पालकमंत्री वेश पालटून आले होते, हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबह उडाली होती. .
त्यानंतर कडू यांनी आपला मोर्चा पातूर शहराकडे वळविला. त्या ठिकाणीही शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कारभाराची पाहणी केली. दुकानांमध्ये जाऊन गुटख्याची विक्री होते की कसे याबाबतही धांडोळा घेतला. स्वस्त धान्य दुकानांना भेट दिली.
पातूर येथील एका बँकेत जाऊन त्यांनी कर्जासाठी अर्ज केला. कर्ज मंजुर करण्यासाठी पैसेही देऊ केले. परंतु व्यवस्थापकाने रितसर पद्धतीनेच अर्ज केल्यानंतर कर्ज मंजुर होईल असे सांगितले. त्यानंतर दोन स्वस्त धान्य दुकानांनाही भेटी दिल्या व धान्याची मागणी केली. परंतु, ऑनलाइन वितरण व्यवस्था असल्याने कोणालाही धान्य देता येणार नसल्याचे त्यांना दुकानदारांनी सांगितले. एका दुकानात प्रतिबंधित गुटख्याची मागणी केली असता दुकानदाराने त्यांना दिला. त्यावेळी कडू यांनी पोलिसांना बोलावून गुटख्याचा साठा जप्त करून दिला व स्वत:समक्ष गुन्हा दाखल करून घेतला.