अकोला, दि. ५: प्रभाग क्रमांक १३ मधील काँग्रेस नगरसेविकेच्या पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे पत्र महापालिकेत धडकताच पालिका प्रशासनाने शुक्रवारी अतिक्रमक शेख इब्राहिम यांना नोटीस जारी केली.काँग्रेसच्या नगरसेविका जैनबबी शेख इब्राहिम यांचे पती शेख इब्राहिम यांनी मनकर्णा प्लॉटमधील नझुल प्लॉट क्रमांक १५, शिट क्र. ३७ बी मध्ये अनधिकृत बांधकाम उभारले. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी बुडन गाडेकर यांनी पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे तक्रार केली असता, प्रशासनाच्या तपासणीत मंजूर बांधकामापेक्षा १२७.0५ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत असल्याचे उघड झाले होते. याव्यतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांच्या अहवालानुसार नगरसेविका जैनबबी इब्राहिम यांच्या मुलांनी बांधलेल्या कॉम्प्लेक्समधील तळघराला मंजुरी नसल्याचे नमूद करून कॉम्प्लेक्सचे एकूण २६0 चौरस मीटर बांधकाम अनधिकृत असल्याचा अहवाल दिला होता. प्रशासनाची संथगती पाहता राकाँचे पदाधिकारी गाडेकर यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. तसेच जिल्हाधिकार्यांकडेही तक्रार केली होती. गाडेकर यांच्या पत्राची दखल घेत पालकमंत्री डॉ. पाटील व जिल्हाधिकार्यांनी याप्रकरणी मनपाने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांनी नगररचना विभागामार्फत शेख इब्राहिम यांना नोटीस पाठवली.
पालकमंत्री, जिल्हाधिका-यांचे पत्र धडकताच नोटीस जारी
By admin | Published: August 06, 2016 1:52 AM