मूर्तिजापूर : पालकमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती-दयार्पूर मार्गे मंगळवारी मूर्तिजापूर गाठले आणि अचानक भटोरी रोडवरील ओम जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी, उपजिल्हा रुग्णालय, कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेड धान्य खरेदी केंद्राला भेट देऊन विविध कामांचा आढावा घेतला.पालकमंत्री कडू यांनी ओम जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजता भेट देऊन पाहणी केली. कापूस विक्रीसाठी शेतकरी सोमवारपासून फोनद्वारे नोंदणी करीत आहेत यात शेकडो शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून बुधवारपासून खरेदी सुरू करण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात जाऊन पालकमंत्री बच्चू कडू यांनी कापूस खरेदीसाठी नोंदणी केलेल्या भाऊराव फाटे नामक शेतकºयाला पहिला फोन करुन बुधवारी ९ वाजता कापूस विक्रीसाठी येण्याचा संदेश दिला. तसेच पालकमंत्री कडू यांनी नाफेड धान्य खरेदी केंद्रावर जाऊन पाहणी केली आणि तेथील धान्य-खरेदी-विक्रीची माहिती घेतली. तसेच लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. कोरोना आजाराच्या उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची पहाणी करीत उपकरणे सुस्थितीत असलेल्याची खात्री करून घेतली. यावेळी संबधित विविध विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)