ह्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. ही परीक्षा ऑफलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा जरी ऐच्छिक असली तरी अकरावीत प्रवेश प्रथमतः ही सीईटी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे दहावी पास झालेले जवळपास सर्वच विद्यार्थी या सामायिक प्रवेश परीक्षेत बसतील. तसेच बारावीनंतरही व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे व त्याच परीक्षेतील गुणांच्या आधारावरच व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश निश्चित करण्यात येतील.
त्यामुळे दहावी व बारावी परीक्षांचे ठरावीक सूत्रे लावून जवळपास अविश्वसनीय शंभर टक्के निकाल लावण्याऐवजी सामाईक परीक्षा जी दहावी व बारावीच्या विद्यार्थांची घेणारच आहे, त्यामध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारावर दहावी व बारावीचे निकाल लावले असते तर ते अधिक योग्य व उचित झाले असते.
शिक्षण मंडळाने, नॅशनल टेस्टिंग एजन्सीप्रमाणे परीक्षेचे नियोजन केले असते तर परीक्षेच्या निकालाची विश्वासार्हता वाढली असती.
डॉ. संजय खडक्कार, राज्यपाल नामित सदस्य, परीक्षा मंडळ