अकोला : वाहतूक शाखेद्वारे सुरू असलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानानिमित्त वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी आरएलटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आरएलटी विज्ञान महाविद्यालयात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलासराव पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, ट्रॅफिक पोलीस पंकज, उमेश, प्रा. कोचाडे, प्रा. समाधान मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता सुरक्षासंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारत १९४७ साली स्वतंत्र झाला. त्यानंतर २ जानेवारीपासून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कायद्यातील घटकाप्रमाणे उदय दिवसाची सुरुवात केली. त्यानुषंगाने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात वाहन चालकांनी वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर करू नये, सिग्नलवर वेळेचे पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करा, आपल्यासमोर एखादा अपघात झाल्यास टोल फ्री अॅम्ब्युलन्सचा वापर करावा, जखमी व्यक्तीला लवकरात लवकर दवाखान्यात न्यावे, घडलेल्या घटनेविषयी पोलीस कोणतेही प्रश्न विचारणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. शहरात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे मागील वर्षात अपघातात २५० मृत्यू, ४५० जखमी तर महाराष्ट्रात एक लाख पंचावन्न हजार मृत्यू आणि देशात आठ लाख मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. अकोला शहरात आठ हजार आॅटोंची आवश्यकता आहे; परंतु सध्या चोवीस हजार आॅटो शहरात चालत आहेत, याची खंत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आभार प्रगती नवलकार यांनी केले.