या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम व पोलीस निरीक्षक गजानन शेळके हे होते. अकोला शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व अपघातविरहित ठेवायची असेल तर ऑटो चालकांनी स्वयंशिस्त व वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना सौजन्याची वागणूक देणे आवश्यक आहे, शहरात वाहनांच्या संख्येच्या तुलनेत आवश्यक मूलभूत सुविधा जसे पार्किंग व ऑटो थांबे नाहीत त्यामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावित होते, त्यातच ऑटोची अमर्याद संख्या व त्या तुलनेत कमी प्रवासी यामुळे प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेत वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याची माहिती शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी दिली.
माेबाइल परत करणाऱ्यांचा सत्कार
महागडा मोबाइल व राहिलेले सामान परत करणारे ऑटोचालक मोहम्मद जावेद मोहम्मद मूर्तजा रा. खैरमोहम्मद प्लॉट, तसेच ऑटोचालक सुभाष रामभाऊ चांदूरकर रा कुंभारी यांनी १० दिवसापूर्वी कृषीनगर येथे राहणाऱ्या एका पुरुषाचा ऑटोमध्ये राहिलेला मोबाइल व कागदपत्रे त्यांचा शोध घेऊन परत केल्याने त्यांचे प्रामाणिकपणाबद्दल शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिस्तप्रिय ऑटाेचालकांचा हाेणार गाैरव
ऑटोचालकांना चांगले व प्रामाणिक काम करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून दर महिन्यात चांगले व प्रामाणिक काम करणाऱ्या ऑटोचालकांचा माहितीची खात्री करून शहर वाहतूक कार्यालयात गाैरव करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी जाहीर केले. तर नियम मोडणाऱ्या व गुंडगिरी करणाऱ्या ऑटोचालकांना वठणीवर आणण्यासाठी दंडात्मक व प्रसंगी पोलिसी हिसकाही दाखविण्यात येईल असेही त्यांनी सांगीतले.