राम देशपांडे/अकोला शासनाने १ जुलै रोजी संपूर्ण राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत यवतमाळ वनवृत्तातातील अकोला, वाशिम, यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये १४ लाख ४६ हजार वृक्षरोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती विभागीय वनअधिकारी अरुण मेहेत्रे यांनी 'लोकमत'ला दिली. या उपक्रमावर 'गिनीज बुक'च्या अधिकार्यांची करडी नजर राहणार असून, या 'मेगा' उपक्रमाची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. राज्य शासनाने १ जुलै रोजी आयोजित केलेल्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत यवतमाळ वनवृत्तातील १२६ ठिकाणी १४ लाख ४६ हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण व प्रादेशिक वन विभाग यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत यवतमाळ वनवृत्तातील अकोला, वाशिम, यवतमाळ या तीन जिल्ह्यांतील २९ तालुक्यांमध्ये १२६ ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मेहेत्रे यांनी दिली. या वृक्ष लागवडीची पूर्वतयारी म्हणून तीनही जिल्ह्यांतील वन अधिकारी, कर्मचारी तथा वनमजुरांच्या वेळोवेळी कार्यशाळा घेण्यात आल्या असून, वृक्ष लागवडीदरम्यान उपयोगात आणावयाच्या ह्यजीपीएसह्ण तंत्राबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात होणार्या दोन कोटी वृक्ष लागवडीसह, यवतमाळ वनवृत्तातील वृक्ष लागवडीची माहिती 'जीपीएस' तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकलित करण्यात येणार आहे. संकलित झालेल्या माहितीच्या आधारे वृक्ष लागवडीची नेमकी टक्केवारी निश्चित होण्यास मदत होईल.
१२६ ठिकाणी घेण्यात आली 'जीपीएस'चाचणीवनवृत्तातील यवतमाळ, अकोला व वाशिम जिल्ह्यांमध्ये १२६ ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या ठिकाणी लागवड करण्यात येणार्या रोपांना ह्यटॅगह्ण लावले जातील. १२६ ठिकाणी लागवड करण्यात येणार्या रोपांची माहिती 'जीपीएस' तंत्राद्वारे पाठविणे शक्य आहे किंवा नाही, याची यशस्वी चाचणी सर्व ठिकाणी घेण्यात आली असल्याचे मेहेत्रे यांनी स्पष्ट केले.