अकोला - बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी आम्ही जनजागृती, चळवळ उभारणार आहोत. त्यासाठी बोंडअळी नियंत्रणाचा गुजरात पॅटर्न राज्यात राबविणार असल्याची माहिती कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी येथे दिली.अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (डॉ. पंदेकृवि) व परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने (स्व. वनामकृवि) पंदेकृविमध्ये आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी फुंडकर बोलत होते.बीटी कापसावरील बोंंडअळीमुळे शेतकºयांना अनेक कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या लागल्याने उत्पादन खर्च वाढला. उत्पन्न मात्र प्रचंड घटल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आम्ही कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, बियाणे, कीटकनाशके उत्पादक कंपन्यांच्या राज्यात बैठका घेऊन जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आणि अमलातही आणला. भविष्यातही हे आव्हान असल्याने बोंडअळीचा समूळ नायनाट करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत असून, गुजरात राज्यात ज्या पद्धतीने कापसावरील बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, तोच कार्यक्रम राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, वरिष्ठ कृषी अधिकारी व मी स्वत: गुजरातचा दौरा करणार असून, तेथे राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेणार आहोत, असेही फुंडकर पुढे म्हणाले.
बोंडअळी नियंत्रणासाठी ‘गुजरात पॅटर्न’, कृषिमंत्र्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 3:53 AM