अकोट : श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज यांचा जन्मोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या भक्ती सोहळ्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातून भाविक ऑनलाईन सहभागी होऊन गुरुमाऊलींना वंदन केले.
गुरुमाऊलींचा जयंती महोत्सव दि. ९ मार्चपासून श्रद्धासागर येथे प्रारंभ झाला. या भक्ती सोहळ्याची पूर्णाहुती जन्मोत्सव सोहळ्याने झाली. जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ पहाटे ‘श्रीं’च्या महाभिषेकाने झाला. संस्थाध्यक्ष हभप वासुदेवराव महल्ले यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक पार पडला. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर, सचिव रवींद्र वानखडे, सहसचिव व गुरुवर्यांचे वंशज मोहन पु. जायले पाटील, अवी गावंडे, प्राचार्य गजानन चोपडे, महादेवराव ठाकरे, अशोकराव पाचडे, जयदीप सोनखासकर, दिलीप हरणे, अनिल कोरपे, केशवप्रसाद राठी, गजानन दुधाट आदी उपस्थित होते. गुरुमाऊली जन्मोत्सवानिमित्त आयोजित गुरुमाऊली पालखी सोहळा रथयात्रा कोरोना आपत्तीमुळे रद्द करण्यात असला, तरी मोजक्या वारकऱ्यांनी नगर प्रदक्षिणा केली. दरम्यान, गुरुवर्यांच्या निवासस्थानी माधवराव मोहोकार, पुरुषोत्तम मोहोकार यांनी पालखी पादुकांचा अभिषेक व पूजन करून महाआरती केली. जन्मोत्सव सोहळ्याचा प्रारंभ गुरुपूजनाने झाला. संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांनी गुरुपूजन केले, तर संस्थेच्या विश्वस्तांनी सपत्नीक गुरुवंदना केली. कोरोना आपत्ती काळात संस्थेला आर्थिकदृष्ट्या भरीव मदत व देणगी देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार गुरुबंधू वसंतराव पागृत यांनी स्वीकारला. जयंती महोत्सवातील कार्यक्रमाच्या सोशल मीडिया व समाजमाध्यमांतून थेट प्रक्षेपणाची तांत्रिक बाजू उत्कृष्टरीत्या पार पाडल्याबद्दल अजय अरबट, अतुल मानकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, तीर्थस्थापनेचे उद्यापन संस्थेचे विश्वस्त दादाराव पुंडेकर, पुष्पाताई पुंडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अशोक महाराज जायले, डॉ. गोपाल महाराज झामरे, मोहन महाराज रेळे, सागर महाराज परिहार, कोंडीराम महाराज नागरगोजे, मंगेश महाराज ठाकरे, देवीदास महाराज वानखडे, अनंत महाराज आवारे, प्रा. साहेबराव मंगळे, माधवराव मोहोकार, रमेश महाराज कोरडे आदी उपस्थित होते. कोविड संसर्ग होऊ नये, यासाठी नियमांचे पालन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नंदकिशोर हिंगणकर यांनी, तर संस्थाध्यक्ष वासुदेवराव महल्ले यांनी आभार मानले. हभप अंबादास महाराज मानकर यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने या भक्ती सोहळ्याची सांगता झाली. (फोटो)
ऐसा महात्मा पुन्हा होणे नाही!
-श्रीहरी महाराज
गुरुवर्य वासुदेव महाराज जयंती महोत्सवाने नवी ऊर्जा मिळते. ऐसा महात्मा पुन्हा होणे नाही, असे भावपूर्ण उद्गार प्रख्यात कीर्तनकार हभप श्रीहरी महाराज सोनेकर यांनी यावेळी काढले.
गुरुमाऊली जयंती महोत्सवाची सांगता करताना काल्याच्या कीर्तनात कृष्णलीलांची महती त्यांनी सांगितली.