लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या संकटात अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मनुष्यबळाची मोठी कमी भासत आहे. अशातच इंटर्न डॉक्टर जीवाची बाजी लावून कोविड वॉर्डात रुग्णसेवेच्या माध्यमातून आपल्या गुरूला गुरुदक्षिणा देत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील गुरू-शिष्याचा हा लढा कोरोनाविरुद्धच्या लढाईत विजयी पताका लावणारा ठरेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना सर्वोपचार रुग्णालयात मनुष्यबळाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा संकटाच्या काळात काही डॉक्टरांचा कंत्राट संपल्याने त्यांनी सर्वोपचार रुग्णालयात काम करण्यास माघार घेतली; मात्र प्रशिक्षणार्थी असणाऱ्या इंटर्न डॉक्टरनी रुग्णसेवेची धुरा आपल्या हाती घेत प्राध्यापकांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाविरुद्धच्या लढाईला सुरुवात केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १३१ प्राध्यापक डॉक्टर अन् २०० च्या जवळपास इंटर्न व निवासी डॉक्टरची जोडी कोविड वॉर्डात निरंतर रुग्णसेवा देत आहेत. सर्वोपचार रुग्णालयातील गुरू-शिष्याची ही जोडी आज अकोलेकरांसाठी देवदूत म्हणून कोरोनाविरुद्ध लढत आहेत.
आयुर्वेदचे विद्यार्थीही देताहेत रुग्णसेवासर्वोपचार रुग्णालयत इंटर्न डॉक्टर आणि प्राध्यापकांसह आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापकही संकटाच्या या काळात कोरोनाविरुद्ध लढत आहेत. विशेष म्हणजे हे विद्यार्थी त्यांच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात तीन महिन्यांपासून विना मानधन रुग्णसेवा देत आहेत.