अकोला : गस्तीवर असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बाळापूर रस्त्यावर ३० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. राज्यातील सर्वात मोठा गुटका माफिया दिलीप जेठाणी याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीवरून त्यांनी बाळापूर रोडवर गुटख्याच्या ट्रकवर रविवारी सायंकाळपासून पाळत ठेवली. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सिंधी कॅम्पमधील रहिवासी दिलीप जेठाणी याच्याकडे मध्य प्रदेशातील एक ट्रक गुटखा साठा येत असताना विशेष पथकाने एमएच १४ बीएम ४१३३ क्रमांकाचा ट्रक पकडला. या ट्रकचा चालक विष्णुप्रसाद केशर सिंग मालविया राहणार मध्य प्रदेश याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर आणि त्यांच्या पथकाने सदर चालकाला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सदर ट्रकमध्ये तब्बल तीस लाख रुपयांचा गुटखा साठा असल्याची माहिती दिली. त्यानंतर पथकाचे प्रमुख बहाकर यांनी ट्रक ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणला. यामधील गुटका साठेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुख लोभसिंग राठोड यांना देण्यात आली. त्यांचेही पथक तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख बहाकर आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने गुटखा साठ्याची मोजणी केली असता सदरचा गुटखा साठा ३० लाख रुपयांचा असल्याचे दिसून आले. याप्रकरणी सिंधी कॅम्पमधील रहिवासी दिलीप जेठाणी आणि त्याच्या सहकरऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली. सदरचा गुटखा साठा अन्न औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.दिलीप जेठाणी हा विमल गुटखा विक्री करणारा राज्यातील सर्वात मोठा गुटखा माफिया असल्याची माहिती विशेष पथकाच्या प्रमुखांनी दिली आहे. दिलीप जेठाणी या सर्वात मोठ्या माफियावर प्रथमच कारवाई केल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे. यामध्ये नरेश आणि भरतीया नामक गुटखा माफियांच्या सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.