अकोला: जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमधील एका बंद गोदामावर मंगळवारी छापा टाकून, सुमारे ४0 लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. जिल्हय़ातील बहुतांश पोलीस स्टेशनचे लागेबांधे आणि अधिकार्यांच्या पाठराखणीतून मोठय़ा प्रमाणात गुटख्याची विक्री सुरू असल्याचे या कारवाईनंतर उघड झाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फेज क्रमांक ४ मध्ये पंकज राऊत यांचे गोदाम आहे. हे गोदाम अनेक दिवसांपासून बंद असल्याने कुणाच्याही यावर संशय नव्हता; मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सचिन जाधव यांना गुटखा साठय़ाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी या गोदामावर छापा घातला. त्यांनी गोदामातून सुमारे ४0 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पंकज राऊतच्या गोदामात असलेला हा गुटखा साठा कुणाचा आहे, हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, ते बाहेरगावी असल्याने गुटख्या साठय़ाचा मालक उजेडात आला नाही; मात्र राऊत हे बुधवारी अकोल्यात येणार असून त्यानंतर पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत. त्यांच्या चौकशीतून गोदाम कुणाला भाड्याने दिले आहे, गुटखा कुणाच्या मालकीचा आहे, हे स्पष्ट होणार आहे. एमआयडीसी पोलिसांच्या नाकाखाली टिच्चून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गुटख्याची उलाढाल सुरू असताना पोलीस काय करीत आहेत, असा सवाल विशेष पथकाच्या कारवाईनंतर समोर आला आहे. पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे गुटखा माफियांचे चांगलेच फावले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख सचिन जाधव, रामेश्वर गिरी, शैलेष घुगे, उदय शुक्ला, अनिल राठोड व नीलेश यांनी केली. गुटख्याचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. एम. कोलते व अन्न निरीक्षक रावसाहेब वाकडे यांच्या ताब्यात देण्यात आला असून, त्यांची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
बंद गोदामातून ४0 लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: June 01, 2016 1:15 AM