अकोट, दि. १५- तालुक्यातील वर्हाडची देहू म्हणून ओळखल्या जाणार्या श्रीक्षेत्र कालवाडी येथे १४ मार्च रोजी संत तुकाराम बीज सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.गुरुमाउली संत वासुदेव महाराज यांच्या प्रेरणेने उभारलेल्या जगतगुरु संतशिरोमणी श्री तुकाराम महाराज मंदिरात तुकाराम बीज सप्ताह पार पडला. फाल्गुन वद्य बीजेला या छोट्याशा गावात पंढरपूर व देहू अवतरल्याचा अनुभव आला. ह्यपुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामह्णच्या घोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला. वीणा, टाळ, मृदंगांच्या स्वरात अभंग गात भाविक भक्तीरंगात न्हाऊन गेले होते. पालखी सोहळा व गाथा दिंडी नगरप्रदक्षिणेचा भक्ती सोहळा डोळ्याचे पारणे फेडून गेला. पालखीचे घरोघरी श्रद्धा व भक्तीने भावपूर्ण पूजन करण्यात आले. ह.भ.प. महाराजांनी भक्तीरंगाची उधळण केली. अनंत महाराज हिंगणकर यांनी पालखीचे पूजन केले .दरम्यान, बीजेला पहाटे संत मंदिरात रितेश सुधाकर हिंगणकर यांच्या हस्ते संताभिषेक व महाआरती पार पडली. पूजेचे पौराहित्य मोहन महाराज रेळे यांनी केले. कालवाडी येथील संत तुकाराम बीजोत्सवाची सांगता ज्ञानेश प्रसाद पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या कीर्तनात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वारकर्यांचे प्राणाहून प्रिय आहेत. त्यांनी वेदांत शास्रांचे ब्रम्हज्ञान सामान्य लोकांपयर्ंत पोहोचविले. जनउद्धारासाठी त्यांनी अवतार घेतला. भक्ती ज्ञानाचा जीवन मार्ग प्रशस्त केला.भक्ती व ज्ञान वैराग्याचे ते मूर्तिमंत संत होते, असे भावोद्गार ज्ञानेश प्रसाद पाटील यांनी काढले. संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाच्या अभंगातून तुकोबांचा खरा इतिहास विषद केला. संत तुकाराम महाराज यांचे पहिले मंदिर कालवाडीला उभारले गेले, ही अलौकिक घटना आहे. ही गुरुवर्य महाराज यांची कृपा आहे. वै.पंजाबराव हिंगणकर यांनी श्रद्धासागर व तुकोबाचे मंदिर अशा दोन तीर्थस्थळांचे निर्माण कार्य करून त्यांनी गुरुसेवा केली, असे सांगून त्यांच्या पावन स्मृतिंना उजाळा दिला.भक्तीसोहळ्याला सहकार्य करणारे महाराज, श्रद्धासागरचे विश्वस्त व देणगीदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सचिन हिंगणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात अनंत महाराज हिंगणकर यांच्या नेतृत्वात युवकांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. तद्नंतर महाप्रसादाने या भक्तीसोहळ्याची सांगता झाली. श्रीक्षेत्र दीपोत्सवाने उजळले!संत तुकाराम बीजेच्या पूर्वसंध्येला तुकोबा या पुण्यभूमीत साक्षात अवतरतात, या भावनेने कालवाडीचे ग्रामस्थ भक्तीरंगात न्हाऊन निघाले. भाविकांनी भक्तीरंगाची उधळण करीत दीपोत्सव साजरा केला. घरोघरी सडासारवण, रांगोळी व पताकांनी ही संतवाडी फुलून गेली होती. ह्यसाधूसंत येती घरा तोचि सण दिवाळी दसराह्ण याचा अनुभव आला. टाळ, मृदंगाच्या स्वरात ज्ञानोबा-तुकारामाच्या गजराने ही भूमी दुमदुमून गेली होती. घरोघरी तोरणे दिवे, लावत दीपोत्सवात हे गाव उजळून गेले होते. दरम्यान, देवीदास महाराजांचा (चोखोबांचे) भक्तीभावपूर्ण स्वागत सोहळा पार पडला. त्यांचे हरिकीर्तन पार पडले.
कालवाडीमध्ये ज्ञानबा-तुकारामाचा गजर
By admin | Published: March 16, 2017 2:44 AM