अकोला - मुलीच्या शाळेत फीचे २५० रूपये द्यायचे असल्याने, कपाट उघडले. परंतु कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले रोख ४८ हजार रूपये आणि सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. ही घटना २६ सप्टेंबर रोजी शिवणीतील आंबेडकर नगरात सायंकाळी घडली. याप्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिवणीतील प्रियंका देवानंद जगताप(३१) यांच्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पतीची दीड लाख रूपयांची भिसी उघडली होती. या भिसीतील ५० हजार रूपये घरातील कपाटात ठेवलेले हाेते. बचत गटाचे दोन हजार रूपये भरायचे असल्याने, त्या बॅंकेत गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या सासु घराचे दार न लावता, बाहेर गेल्या. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी परत आल्यावर सर्वांनी जेवण केले.
दरम्यान मुलीने शाळेची फी भरायची असल्याने, २५० रूपये मागितले. त्यावेळी प्रियंका जगताप यांनी कपाट उघडले असता, त्यांना लॉकरमध्ये ठेवलेले ४८ हजार रूपये आणि दोन एकदाणी व मंगळसूत्र, पोथ आदी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळून आले. या प्रकरणात त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.