वणी रंभापूर : परिसरात गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदाेस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी होत आहे. तसेच पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी शेतात जागरण करीत असल्याचे चित्र आहे.
परिसरात खरीप हंगामाील सर्वच पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या शेतात कपाशी आणि तूर आहे. कापूस वेचणीस आला असून, काही शेतकऱ्यांची तूर फुलांवर, तर काहींच्या तुरीला शेंगा लागल्या आहेत. अशात वन्य प्राणी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. हरीण, रानडुकरे, माकड आदी प्राणी शेतात कळपांनी येऊन कपाशी व तूर पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वन विभागाकडून ताेकडी मदत देण्यात येते. आधीच सततच्या पावसामुळे खरिपाच्या पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच पावसातून बचावलेल्या पिकाचे वन्य प्राणी नुकसान करीत आहेत. परिसरातील वणी रंभापूर , निपाणा, राजापूर परिसरात शेतकरी वन्य प्राण्यांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी रात्री राखणीला जात असल्याचे चित्र आहे.
----------------------------
वीज पुरवठा रात्रीच!
सध्या परिसरातील निपाणा, राजापूर शेतशिवारात रब्बी हंगामात पेरणीचे कामे सुरू आहेत. पेरणी केलेले पीक सध्या अंकुरलेले आहे. तसेच परिसरात कृषी पंपांना वीज पुरवठा रात्रीच केला जात असल्याने शेतकरी रात्री पाणी देण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून शेतात जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवसा वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.