राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव शेतशिवारात खरीप हंगामातील पिके बहरली आहेत. गत दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच बहरलेल्या पिकांत वन्य प्राणी शिरून नासाडी करीत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. वन्य प्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, काही शेतकरी शेतात मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे.
वाडेगाव शेतशिवारात यंदा सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद, मूग आदी पिकांचा पेरा वाढला आहे. सद्य:स्थितीत पाऊस चांगला होत असल्याने शेतशिवारातील पिके बहरली आहेत. बहरलेल्या पिकांत हरणाचे कळप, रानडुकरे, रोही आदी प्राणी जात नुकसान करीत आहेत. दरवर्षीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नुकसानग्रस्त शेतात जाऊन वन विभागाने तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
----------------
वन्य प्राण्यांचा कळपचा कळप अवघे पीक फस्त करीत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. वन विभागाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.
शिवाजीराव म्हैसने, देगाव, शेतकरी
----------------------------
पीक वाचविण्यासाठी वाडेगाव येथील शेतकऱ्याने लढविली शक्कल
वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वाडेगाव येथील शेतकरी अनंता चिंचोळकार यांनी आगळीवेगळी शक्कल लढवली आहे. त्यांनी एक लोखंडी गज घेऊन त्याला पोत्याचे बारदान लटकविले आहे. पोत्यावर खराब ऑइल टाकले असून, पोत्यात हिरव्या किंवा लाल मिरच्या टाकल्या. त्यानंतर त्यांनी हे पोते पेटवून दिले आहे. त्यामुळे ठसका होऊन वन्य प्राणी शेतात येत नाहीत, असा शेतकरी अनंता चिंचोळकर यांनी दावा केला आहे.