अकाेला: जुने शहरातील कॅनाॅल रस्त्याचे खडीकरण केल्यानंतर रस्त्याच्या दाेन्ही कडेने माेठ्या नाल्यांचे बांधकाम केले जात आहे. यातील एका बाजूच्या नालीचे बांधकाम पूर्ण झाले असताना दुसऱ्या बाजूचे काम अर्धवट असल्यामुळे स्थानिक रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या मुद्यावर शुक्रवारी प्रहार संघटनेचा माेर्चा महापालिकेत धडकला. कंत्राटदारांच्या मनमानीला चाप लावण्याचे निवेदन वजा इशारा प्रहारचे शहराध्यक्ष मनाेज पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला.
जुने शहरातील कॅनाॅल राेडचे भिजत घाेंगडे अद्यापही कायम असल्यामुळे पावसाळ्यात स्थानिक रहिवाशांना अताेनात त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या काळात कॅनाॅल रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला हाेता. या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी हाेत नसल्याचा आराेप प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष मनाेज पाटील यांनी केला. संत गाेराेबा मंदिर पासून ते रेल्वे रुळ तसेच डाबकी राेड ते बाळापूर नाका ते शिवसेना वसाहतमधून थेट राष्ट्रीय महामार्गापर्यंत कॅनाॅल रस्त्याचे निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. वर्तमानस्थितीत महापालिका प्रशासनाने सिमेंट रस्त्याऐवजी केवळ खडीकरण केले. रस्त्याच्या दाेन्ही कडेला काेट्यवधी रुपयांतून नाल्यांचे निर्माण केले जात आहे. यातील एका बाजूच्या नालीचे बांधकाम पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूचे नालीचे बांधकाम कंत्राटदारांची मनमानी व प्रशासनाच्या उदासिनतेमुळे ठप्प झाल्याचे नमुद करीत मनाेज पाटील यांच्यासह असंख्य महिला व पुरुषांनी महापालिकेत धाव घेतली.
आयुक्तांच्या प्रवेशद्वाराला कुलूपसमस्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी मनपात दाखल झालेल्या महिला व पुरुषांनी आयुक्त डाॅ.सुनिल लहाने यांच्या दालनाकडे जाण्याचा प्रयत्न केला असता, कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आयुक्त उपस्थित नसल्याचे सांगत प्रवेशद्वाराला कुलूप लावले. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आयुक्तांच्या कार्यालयासमाेर ठिय्या देत प्रशासनाच्या विराेधात नारेबाजी केली.
उपायुक्तांनी स्वीकारले निवेदनमनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी प्रहारचे शहराध्यक्ष मनाेज पाटील व महिलांकडून निवेदन स्वीकारले. नालीच्या बांधकामात अडथळा ठरणारे अतिकमण तातडीने काढण्याचे आश्वासन उपायुक्त ठाकरे यांनी दिले. यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर उपस्थित हाेते.