लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत डिसेंबरपर्यंत गावे हगणदरीमुक्त करावयाची असताना जिल्हय़ातील निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोणतीच कामे न झाल्याने नऊ ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी मंगळवारी दिले. एकाच वेळी ही कारवाई झाल्याने ग्रामसेवक बिथरले आहेत. जिल्हय़ातील ग्रामीण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर आहे. त्यामध्ये विशेषत: घरकुल योजना व स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरीला होणारा विलंब, आमचं गाव, आमचा विकास, आपले सरकार सेवा केंद्र, सेवा हमी कायदा, नरेगा, जलयुक्त शिवार, धडक सिंचन विहीर योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने गावे विकासापासून वंचित आहेत. त्यातच स्वच्छ भारत मिशन अंतर्ग त संपूर्ण तालुके ३0 डिसेंबरपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र त्यातील शौचालयांची कामे सुरूच न करणार्या ग्रामसेवकांच्या निलंबनाचा प्रस्ताव पंचायत विभागाने मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे सादर केला. त्यावर मंगळवारी स्वाक्षरी झाल्याने नऊ ग्रामसेवकांना निलंबनाचे आदेश देण्यात आले.
निलंबित झालेले ग्रामसेवकनिलंबित झालेल्यांमध्ये चार ग्रामविकास अधिकारी आहेत. त्यामध्ये वाडेगाव येथील एस.व्ही. डोंगरे, हातरूण येथील पी.एन. जामोदे, बेलखेड येथील ए.एन. उंबरकर, भटोरी येथील पंकज गुजर यांचा समावेश आहे. ग्रामसेवकांमध्ये टाकळी खोजबोळचे व्ही.आर. अंधारे, सौंदळाचे जी.एस. भुस्कुटे, आडसूळचे जी.एस. गवळी, तेल्हारा तालुक्यातील खंडाळाचे एस.बी. काकड, बाळापूर पंचायत समितीतील ए.एम. शिंदे यांचा समावेश आहे.