अकाेला : कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी भीक मागून धडपड करणाऱ्या विक्की मांडाेकार या चिमुकल्याची व्यथा ‘लाेकमत’ने गुरुवारी प्रकाशित करताच त्याच्या मदतीला अकाेल्यातील दातृत्वाचे हाथ धावून आले. येथील श्रीराम शाेभा यात्रा समितीने संत तुकाराम कॅन्सर हाॅस्पिटलला दहा हजारांचा धनादेश देऊन औषधांचा खर्च करण्याची विनंती केली. साेबतच अनेक दात्यांनी शाेभा मांडाेकार यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करून आम्ही तुमच्या साेबत आहाेत, असा धीर दिला.
दाळंबी येथील शाेभा मांडाेकार या विधवा महिलेला कॅन्सर झाला असून, तिच्यावर संत तुकाराम हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शासकीय याेजनेतून उपचार हाेत असले तरी इतर औषधे तसेच दरराेजच्या खर्चासाठी त्यांच्या १२ वर्षांच्या विक्की या मुलाला अकाेल्याच्या काैलखेड, मलकापूर परिसरात भीक मागावी लागली हाेती. ही बाब युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सागर खंडारे यांना कळताच त्यांनी मदतीचा हात दिला. याबाबतचे वृत्त गुरुवारच्या अंकात ‘लाेकमत’ने प्रसिद्ध् केले हाेते. त्याची दखल घेत सामाजिक संस्थांसह दात्यांनी मदतीसाठी हात पुढे केला. श्री रामनवमी शोभायात्रा समिती व कालू रामजी रूहाटीया चॅरिटेबलच्या वतीने उपचारासाठी लागणारी औषधे, इंजेक्शनसाठी दहा हजार रुपये संत तुकाराम हॉस्पिटलचे मॅनेजर दुबे व अभिजित नायडू व उमाकांत कवडे यांच्याकडे देऊन त्यांना बाहेरून औषधे, इंजेक्शन आणण्याची गरज लागू नये याची दक्षता घेण्याची विनंती केली. यावेळी समितीचे अध्यक्ष विलास अनासने, शिवप्रकाश रुहाटीया, ब्रिजमोहन चितलांगे, अशोक गुप्ता, डॉ. अभय जैन, अनिल मानधने, स्थायी समिती सभापती संजय बडोणे, गिरीराज तिवारी, गिरीश जोशी, चंदाताई शर्मा, सारिका देशमुख, आदी उपस्थित होते.
क्रेडाईचे माजी अध्यक्ष पंकज काेठारी, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, सामाजिक कार्यकर्ते पुरुषाेत्तम शिंदे, बॅंक कर्मचारी दीपक राहटे, शिक्षक शिवशंकर गाेरे, आदींसह अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला
आ. देशमुखांनी घेतली माहिती
आमदार नितीन देशमुख यांनी मांडाेकार परिवाराची माहिती घेऊन त्यांना सर्वताेपरी मदत करण्याची ग्वाही दिली. त्या महिलेला शासकीय याेजनांचाही लाभ देण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली.