शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी सरसावले मदतीचे हातदेशभक्ती: जिल्ह्यासह इरत ठिकाणावरूनही होते मदतबुलडाणा: पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मदतीचे हात सरसावल्याने यातून अनेकांची देशभक्ती समोर येत आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना मदत येत आहे. यामध्ये विद्यार्थी, व्यावसायीक, विविध शैक्षणिक संस्था यांच्याकडून शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात मदत केल्या जात आहे. नायगाव वासियांना फुटला सामाजिक पाझरनायगाव दत्तापूर: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संपूर्ण गावातुन २० हजार ७०० रुपये वर्गणी जमा करण्यात आली होती. परंतू १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा येथील हल्ल्यात जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी शिवजयंतीची मिरवणूक रद्द करून जमा झालेली रक्कम दोन्ही जवानांच्या घरी देण्याचा निर्णय घेतला होता. ती रक्कम २२ फेब्रुवारी रोजी सुपूर्द करण्यात आली. नायगांव दत्तापूर येथे दरवर्षी शिवजयंती टाळ-मृदंगात काढण्यात येते. मिरवणुकीसाठी लागणारा खर्च गावातून वर्गणी जमा करून भागविल्या जातो. याही वर्षी शिवजयंतीनिमित्त वगर्णी जमा करण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील नितीन राठोड व संजय राजपूत दोन जवान शहीद झाल्याने ग्रामस्थांनी शिवजयंती रद्द करून शिवरायांना पूष्पहार अर्पण करून, छत्रपती प्रांगणात राष्ट्रगीत घेत, जवानांच्या कुटुंबियांना मदत देण्याचा निर्णय घेतला. शहीद जवानांच्या प्रतीमेला पूष्पहार अर्पण करून संपूर्ण गावकºयांनी श्रध्दांजली दिली आणि संपूर्ण गावातून व विविध जाती धर्मातून जमा झालेली २० हजार ७०० रुपये रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात आली. दोन्ही जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० हजार ३५० रुपये देण्यात आले. खरबडी : पुलवामा येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला. महिला व पुरुषांनी हातात मेनबत्ती घेवून गावातून प्रभातफेरी काढली. किनगाव राजा: चोरपांग्रा येथील शहीद सैनिक नितीन राठोड यांच्या कुटुंबियांची जालना जिल्ह्याचे मनसे जिल्हाध्यक्ष बळीराम तात्या खटके यांनी घरी जावून भेट घेतली. त्यानंतर त्यांना ११ हजार रुपयांचा धनादेश देवून आर्थिक मदत केली. यावेळी नंदू उबाळे, राजेश सपकाळ, अनिकेट खटके, अभि खटके, वैभव शिंदे, राजेश इंगळे, दिलीप राठोड, दिलीप जाधव व मनसे पदाधिकारी उपस्थित होते. हिवरा खुर्द: पुलवामा घटनेतील शहीद कुटुंबियासाठी येथे मदतफेरी काढण्यात आली. स्थानिक जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून व जानेफळ येथे घरोघरी प्रत्येक दुकानावर जावून मदतनिधी गोळा केला. यावेळी प्रत्येकाने चिमुकल्यांच्या हाती असलेल्या बॉक्समध्ये आपल्या परीने मदतनिधी टाकला. आजपर्यंत विद्यार्थ्यांनी २८ हजार रुपये मदतनिधी जमा केला आहे. यामध्ये पुन्हा मदतीची भर टाकून शिक्षक व विद्यार्थी मिळून ५१ हजाराची मदत विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते शहीद जवानांच्या घरी पोहचविल्या जाणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संजय जारे यांनी दिली. सोनोशी: पुलवामा येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद सैनिकांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. शुक्रवारी सोनोशी येथील मुस्लिम बांधवांनी कवी शेख बिस्मिल्ला सोनोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जफर शेख, अमर शेख व इतर मुस्लिम बांधवांच्या सहकार्याने शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली. यामध्ये सर्व गावकरी सहभागी झाले होते. आझाद चौकात राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी सरसावले मदतीचे हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 5:57 PM