अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात हातपंप दुरुस्तीची कामे खासगी कंत्राट पद्धतीने करण्यास जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तसेच आकोट पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्यास (बीईओ) सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठरावही या सभेत मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषदमार्फत नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात येत असलेल्या ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्तीची कामे खासगी कंत्राट पद्धतीने करण्याबाबतच्या विषयाला प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. बोरगाव मंजू येथील रामजीनगरात जिल्हा परिषद सर्वशिक्षा अभियान अंतर्गत शाळा खोल्यांचे बांधकाम सुरू असून, ३७.५ टक्के प्राप्त निधीतून लेंटलपर्यंतचे काम पूर्ण झाले. उर्वरित कामासाठी आवश्यक असलेला निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली. आकोट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी (बीईओ) राजू ठाकरे पंचायत समितीच्या मासिक सभेला उपस्थित राहत नसून, त्यांचे शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष होत आहे. गटशिक्षणाधिकारी शाळांना भेटी देत नसून, शिक्षकांचे वेतनही रखडले. त्यामुळे बीईओ ठाकरे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. आकोट तालुक्यातील वरुड बु. येथे शौचालय बांधकामासाठी ग्रामस्थांनी लाभार्थी हिस्सा रक्कम जमा केली; मात्र शौचालयांची कामे अद्याप करून देण्यात आली नाही. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी सदस्य शोभा शेळके यांनी सभेत केली. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती रामदास मालवे, गोदावरी जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, पुंडलीकराव अरबट, डॉ.हिंमत घाटोळ, शोभा शेळके, गजानन उंबरकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हातपंप दुरुस्तीची कामे कंत्राट पद्धतीने!
By admin | Published: September 24, 2015 1:39 AM