22 गुन्ह्यांची उकल, 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अकोला : जिल्ह्यातील बाळापूर, माना, तेल्हारा, उरळ, दहीहंडा व शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेतकऱ्याचे धान्य चोरी करणाऱ्या मोठ्या टोळीला बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी यश आले. या चोरट्यांच्या टोळीला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सुमारे बारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या टोळीने तब्बल 22 गुन्हे केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.
बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्हेरी सरप येथील रहिवासी रवींद्र किसनराव सानप यांच्या शेतातील सुमारे एक लाख 70 हजार रुपयांचे धान्य चोरी गेल्याची तक्रार त्यांनी १ फेब्रुवारी रोजी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर अशाच प्रकारच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात जिल्हाभर झाल्याचे समोर आले. या सर्व चोऱ्यांची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकत्रित करुन चोरट्यांचा शोध सुरू केला. पोलीस अधीक्षक जी श्रीधर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात पथकाचे गठण करून शेतकऱ्यांचे धान्य चोरणाऱ्या चोरट्यांचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीवरून या पथकाने अकोट फाईलतील सिद्धार्थ वाडी येथील रहिवासी शेख रफिक शेख बशीर, सय्यद अमीन सय्यद अली राहणार भारत नगर अकोट फाईल, ख्वाजा हवनोद्दीन ख्वाजा अमिरोद्दीन राहणार भारत नगर अकोट फाईल या तिघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता तिघांनाही त्यांच्या आणखी दोन साथीदारांना सोबत घेऊन जिल्हाभर तब्बल २२ शेतकऱ्यांच्या शेतातील धान्य व साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. या चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेले दोन वाहने जप्त करण्यात आली आहे. यामध्ये एम एच 30 बीडी 0617 आणि एम एच 30 बीके 1453 या दोन वाहनांचा समावेश आहे. या सोबतच 3 मोबाईल व आणखी काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या चोरट्यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर, दहीहंडा, माना उरळ जुने शहर पातूर चांणी, तेलारा, पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातील चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. हे धान्य कुठे विकले यासह त्यांच्या साथीदारांच शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, गणेश पांडे, अश्विन मिश्रा, गोकुळ चव्हाण, शक्ती कांबळे, शेख वसीम, किशोर सोनोणे, गोपाल पाटील, अनिल राठोड, प्रवीण कश्यप, विजय कपले, ओम देशमुख, गणेश सोनणे, गोपाळ ठोंबरे यांनी केली.