लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ५५ वर्षीय दिव्यांग रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले; परंतु या ठिकाणी वॉर्डात नेण्यासाठी कोणीच मदतीसाठी पुढे न आल्याने त्या दिव्यांग रुग्णाला तब्बल दोन तास रुग्णवाहिकेतच राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सिंधी कॅम्प परिसरातील ५५ वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांना २५ जुलै रोजी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णालयातर्फे त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली. यामध्ये बुधवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तत्पूर्वी रॅपिड अॅन्टिजन टेस्टमध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांना रुग्णवाहिकेद्वारे सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे कोणीच रुग्णाला रुग्णावाहिकेतून काढण्यास मदतीसाठी समोर आले नाही. रुग्णाच्या नातेवाइकांनी तथा काही समाजसेवकांनी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला; परंतु येथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना नकार दिला. तब्बल दोन तास रुग्णवाहिकेमध्ये ताटकळत बसल्यानंतर त्या दिव्यांग रुग्णाला वॉर्डात नेण्यात आले.कोरोनामुळे माणुसकीचा विसर!जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून माणुसकीचा विसर पडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सुरुवातीला कोरोना वॉर्डात कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांपासून शेजारच्यांनी दुरावा केला, तर कधी नातलगाचाच मृतदेह घेण्यास नकार दिल्याच्या घटना समोर आल्यात. तर आता दिव्यांग व्यक्तीला कोरोना असल्याने त्याच्या मदतीलाही कोणी पुढे येत नसल्याचा धक्कादयक प्रकार घडल्याने माणुसकीचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिव्यांग रुग्णांसाठी सुविधा नाहीच!सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र येथे येणाºया दिव्यांग रुग्णांसाठी कुठलीच सुविधा नसल्याचे वास्तव गुरुवारच्या घटनेवरून समोर आले.
रुग्णसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत खाटांची संख्या कमी पडत आहे. नवीन रुग्णांसाठी खाटांची तडजोड करावी लागते. जिल्ह्याबाहेरून येणाºया रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयावरील ताण वाढत आहे. नवीन हॉस्पिटल किंवा इतर पर्यायाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. त्यामुळे लवकरच खाटांच्या कमतरतेवर तोडगा काढण्यात येईल.- डॉ. मीनाक्षी गजभिये,अधिष्ठाता, जीएमसी, अकोला